Anjali Damania | शिंदे गट पुन्हा बाहेर पडण्याची भाजपाला भीती? राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव टाकून प्लॅन बी सुरू? अंजली दमानियांचे मुद्दे चर्चेत
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याची पोलखोल पत्रकार परिषदेमार्फत करणार असल्याचे संकेतही मोहित कंबोज यांनी दिलेत. त्यामुळे तपास यंत्रणांची सुई आता कुणाकडे वळणार, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.
मुंबईः महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) शिवसेना नेतृत्वाविरोधात बंड पुकारलेला एकनाथ शिंदे गट (Eknath Shinde Group) आता भाजपसोबत सरकारमध्ये तर आहे, मात्र असमाधानी असल्यामुळे तो कधीही बाहेर पडेल, असी भीती भाजपला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Leaders) नेत्यांवर दबाव टाकून त्यांना आपल्याकडे खेचण्याचा प्लॅन बी भाजपतर्फे आखला जात असल्याचा आरोप भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. मात्र आज सकाळीच भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेल्या एका ट्विटवरून राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यानंतर तिसऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचा नंबर असल्याचं ट्विट कंबोज यांनी केलंय. तसेच लवकरच या नेत्याविरोधात पुरावे सादर करण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. भाजपाच्या दबावापुढे तपास यंत्रणा विरोधकांवर कारवाई करत असल्याचा पुन्हा एकदा आरोप केला जातोय. मात्र यामागे शिंदेगटापासून भाजपाला वाटणारी भीती हे कारण असल्याचा मुद्दा अंजली दमानियांनी मांडलाय.
1:- Anil Deshmukh 2:- Nawab Malik 3:- Sanjay Panday 4:- Sanjay Raut 5:- ____________
अपना 100% Strike Rate Hai !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 17, 2022
अंजली दमानियांचे मुद्दे काय?
मोहित कंबोज यांनी केलेल्या ट्विटनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका बड्या नेत्याविरोधात चौकशीसत्र सुरु झाल्यास यामागे भाजपाचा नेमका काय हेतू आहे, यावर अंजली दमानियांनी भाष्य केलंय. त्या म्हणाल्या, ‘ भाजपाला अजित पवार आणि फडणवीस यांचं सरकार आणायचं होतं, तेव्हा सिंचन घोटाळ्याला क्लिनचीट देण्यात आली. मोहित कंबोज यांना पुढे काय होणार हे कसं कळतं? किरीट सोमय्यांना रिटायर्ड करून यांनी आता मोहित कंबोज यांना आणल्याचं दिसतंय… तसेच भाजपला सध्याच्या सरकारमधून शिंदे गट बाहेर पडेल, अशी भीती वाटतेय… म्हणूनच भाजपाचा हा प्लॅन बी सुरु आहे.. राष्ट्रवादी काँग्रेसवर दबाव टाकून त्यांना सोबत घ्यायचा भाजपचा विचार आहे… असं अंजली दमानिया म्हणाल्या. भाजप कुणाचीही फाईल हवी तेव्हा ओपन करते, हवी तेव्हा बंद करते.. विरोधी पक्षाला गप्प करण्याचा आणि अजित पवारांना आपल्याकडे खेचण्यासाठी हा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप अंजली दमानियांनी केलाय.
मोहित कंबोजांच्या ट्विटने नेत्यांना धसकी
महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच भाजप नेते मोहित कंबोज यांनी एक ट्विट केलंय. अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांडे, संजय राऊत यांच्यानंतर पाचवी जागा रिकामी ठेवत अपना स्ट्राइक रेट 100% है… असं ट्विट कंबोज यांनी केलंय. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याची पोलखोल पत्रकार परिषदेमार्फत करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिलेत. त्यामुळे तपास यंत्रणांची सुई आता कुणाकडे वळणार, यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.