निर्णय बदला, नाही तर बंडखोरी परवडणार नाही, नेत्याचा थेट इशारा; शरद पवार गट कात्रीत सापडला?
हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमधून शरद पवार गटात प्रवेश केल्याने इंदापूरचं राजकारण ढवळून निघालं आहे. हर्षवर्धन पाटील हे विधानसभा निवडणुकीत उभे राहणार असल्याचे संकेतच शरद पवार यांनी दिले आहेत. मात्र, पाटील यांच्या प्रवेशामुळे शरद पवार गटात बंडाळी निर्माण झाली आहे. पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आज परिवर्तन मेळावा घेऊन उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमधून शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यात शरद पवार गटाचं बळ वाढलं आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. मात्र, असं असलं तरी हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशामुळे शरद पवार गटातील नेते, पदाधिकारी अस्वस्थ झाले आहेत. या नेत्यांनी आज परिवर्तन मेळावा घेऊन थेट शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनाच इशारा दिला आहे. तुम्ही निर्णय बदला. नाही तर बंडखोरी परवडणार नाही. अख्ख्या महाराष्ट्रात हे मोहोळ उठेल, असा इशाराच शरद पवार गटाच्या नेत्याने दिला आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यात शरद पवार गट चांगलाच कात्रीत सापडल्याचं सांगितलं जात आहे.
हर्षवर्धन पाटील यांना पक्षात प्रवेश दिल्याने शरद पवार गटाचे नेते अप्पासाहेब जगदाळे अस्वस्थ आहेत. त्यांनी पाटील यांच्या प्रवेशाला कडाडून विरोध केला होता. फक्त विरोध करूनच थांबले नाहीत तर त्यांनी थेट परिवर्तन रॅली घेण्याचा इशाराही दिला होता. या इशाऱ्यानुसार जगदाळे यांनी आज हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशाची ज्या ठिकाणी सभा झाली, त्याच ठिकाणी मोठी सभा घेऊन शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना थेट इशारा दिला आहे. यावेळी अप्पासाहेब जगदाळे यांनी मनातील खदखदही बोलून दाखवली आहे.
खुर्च्या परत न्याव्या लागल्या
परवाच्या सभेत 1000 खुर्च्या परत न्याव्या लागल्या. आम्ही तोच प्रचंड मोठा मंडप ठेवलाय आणि फक्त खुर्च्या वाढविल्या आहेत. परवा एवढी लोकं होती का?, असा सवाल करतानाच आम्ही रोखठोक कामे करणार आहोत. तालुक्यातील अधिकारी कसे काम करत नाहीत ते आम्ही पाहणार आहोत, असा इशाराच अप्पासाहेब जगदाळे यांनी दिला.
मामा-भाच्याने फसवलं
सुप्रिया सुळे यांच्या विजयात आमचा अदृश्य हात होता, असं परवाच्या सभेत काही जण याच व्यासपीठावरून म्हणाले. तो कायं असतो? मागून शिक्का मारतो का पुढून?, अशा शब्दात हर्षवर्धन पाटील यांची खिल्ली उडवतानाच मला एका मामाने आणि एका भाच्याने फसवलं, अशी खदखदही त्यांनी व्यक्त केली.
आधी सांगितलं लढणार नाही…
2014 ला आधी मला सांगितलं, मी आता लढणार नाही, तुम्हालाच लढावं लागेल. चार दिवस फॉर्म भरायला राहिल्यावर ते म्हणाले, मी लयं पळालो. मलाचं उभं राहायचं आहे. आम्ही नाराज झालो. आमची समजूत काढली. ही गोष्ट मी पाचवली. त्यानंतर 2019च्या निवडणुकीतही आमचा विश्वासघात केला, अशी टीका त्यांनी हर्षवर्धन पाटील यांनी केली.
अन् डोळे पाणावले
मुलाच्या वाढदिवसाचा किस्सा सांगताना अप्पासाहेब जगदाळे भावूक झाले. मुलाने त्याच्या आईला सांगितलं पप्पाला गाडी घ्यायला लाव. पण त्याची आई म्हणाली, पप्पाची निवडणूक आहे. त्यानंतर मुलगीचा वाढदिवस मी विसरलो होतो. मी तिला विचारलं तुला कायं पाहिजे? ती म्हणाली, कायं नको. तिला पण कळलं पप्पाची निवडणूक आहे म्हणून तिने कायं मागितल नाही, असं सांगताना अप्पासाहेब जगदाळे यांचे डोळे पाणावले होते.
मोहोळ महाराष्ट्रात पसरणार
आम्ही काय करायचं हे जनतेने आम्हाला सांगायचं आहे. उद्याची निवडणूक इंदापूरच्या परिवर्तनाची आहे. तुमची साथ हवी आहे. शरद पवार आणि सुप्रिया ताईंना विनंती… या जनतेवर प्रेम असेलं तर त्यांना निर्णय बदलावा लागेल. इंदापूरची बंडखोरी परवडणारी नाही, हे मोहोळ महाराष्ट्रत पसरणार आहे. घाईगडबडीचा निर्णय चुकीचा होतो, निर्णय तर होणारंचं आहे. पण घाईगडबडीत निर्णय नको, असंही त्यांनी सांगितलं.