Goa Elections 2022: गोव्यात आप आणि तृणमूल एकत्र लढणार का? वाचा काय म्हणाले केजरीवाल
यावेळची गोवा विधानसभेची निवडणूक अधिकच रंगतदार होत आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावेळी भाजपाविरोधात दंड थोपटले आहेत. गोव्यातील भाजपाची सत्ता उलथवून लावण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत.
Goa Elections 2022: गोव्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत ममता बँनर्जींच्या तृणमूल काँग्रेसनेही उडी घेतल्याने राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. भाजप आणि काँग्रेससोबतच आप आणि तृणमूल काँग्रेसही गोव्याच्या निवडणुकीत उतरली आहे. यामुळे निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे. यापेक्षाही अरविंद केजरीवाल ममता बॅनर्जींसोबत युती करणार, याबाबत सर्वांना अधिक उत्सुकता लागून राहिली आहे. मात्र अरविंद केजरीवाल यांनी याचे उत्तर देत याबाबत खुलासा केला आहे.
आप सर्व 40 जागांवर उमेदवार उभे करणार
आम आदमी पक्षाचे (आप) नेते, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेससोबत निवडणूकपूर्व युतीची शक्यता नाकारली आहे. तथापि, मतदानातून जनमत लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर गैर-भाजप पक्षांशी युती करण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे त्यांनी म्हटले आहे. आप गोवा विधानसभेच्या सर्व 40 जागांवर आपले उमेदवार उभे करेल आणि येत्या काही दिवसांत मुख्यमंत्रीपदासाठी पक्षाचा चेहरा जाहीर करेल, असे केजरीवाल यांनी सांगितले.
प्रसंगी निवडणुकीनंतर बिगर-भाजप पक्षांशी युती
केजरीवाल यांनी दिवंगत भाजपचे दिग्गज नेते मनोहर पर्रीकर यांचे कौतुकही केले आहे. गोवा राज्यातील सत्ताधारी पक्षात जर कोणाला “गुदमरल्यासारखे” वाटत असेल तर तो आम आदमी पक्षात सामील होऊ शकतात, असे त्यांनी पणजीच्या दौऱ्यादरम्यान सांगितले. ते म्हणाले की, त्यांचा पक्ष विधानसभा निवडणुकीत खंडित जनादेशाच्या बाबतीत आवश्यकता भासल्यास गैर-भाजप पक्षांसोबत निवडणुकीनंतर युती करू शकतो.
तृणमूल काँग्रेसबाबत दिले हे स्पष्टीकरण
यावेळची गोवा विधानसभेची निवडणूक अधिकच रंगतदार होत आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी यावेळी भाजपाविरोधात दंड थोपटले आहेत. गोव्यातील भाजपाची सत्ता उलथवून लावण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरु ठेवले आहेत. गोव्यातील आमदार त्यांच्या पक्षाच्या मार्गावर येऊ लागले आहेत. त्यामुळे ममता बॅनर्जी आपली ताकद आणखी मजबूत करण्यासाठी केजरीवाल यांच्या ‘आप’बरोबर युती करतात की काय? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. त्यादृष्टीने चर्चांना उधाण आले असतानाच केजरीवाल यांनी पणजी दौऱ्यादरम्यान या चर्चांचे खंडन केले. तृणमूल काँग्रेससोबत निवडणूकपूर्व युती केली जाण्याची शक्यता त्यांनी फेटाळून लावली आहे. गोव्यात तृणमूल काँग्रेससोबत युती का करावी? आम्ही त्यांच्याशी कोणतीही युती करणार नाही, असे त्यांनी जाहीर केले आहे. (Arvind Kejriwal’s reaction to Trinamool Congress and AAP alliance)
इतर बातम्या
Rane vs Shivsena : अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राणे विरुद्ध शिवसेना, वादास कारण की…