मुख्यमंत्री असताना निवडणुका का घेतल्या नाही?; तुमच्या हातात धनुष्यबाण तरी आहे का?; शेलारांचे उद्धव ठाकरेंना कळीचे दोन सवाल
आयना का बायना...घेतल्याशिवाय जायना! असे वागणाऱ्यांकडून सगळ्या टक्केवारीचा हिशेब मुंबईकरच मागत आहेत. मागणारच! 25 वर्षात 21 हजार कोटी खर्च करून मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे कसे?
मुंबई: हिंमत असेल तर महापालिका (bmc) आणि विधानसभेच्या निवडणुका घ्या, असं आव्हानच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी राज्य सरकारला दिलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या या आव्हानाला भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (ashish shelar) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. स्वतः मुख्यमंत्री होता तेव्हा का लगेचच निवडणुका घेतल्या नाहीत? आणि आज आम्हाला काय सांगताय लगेच निवडणूक घ्या. आम्ही तयार आहोत. तुमच्याकडे तुमचा धनुष्यबाण तरी हातात आहे का?, असा खोचक टोला आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. आशिष शेलार यांनी ट्विट करून हा सवाल केला आहे. तसेच दैनिक सामनातून करण्यात आलेल्या टीकेचाही शेलार यांनी समाचार घेतला आहे.
भ्रष्टाचार करणाऱ्या काँग्रेस सोबत सलगी आणि शिवसेनेला संपवून स्वतः वाढणाऱ्या राष्ट्रवादी सोबत अती प्रेमाचे उमाळे यामुळे स्वपक्षातील लढवय्ये मोहरे पक्ष सोडून गेले. महाराष्ट्र हातून गेला, आता मुंबईकरांच्या हातून मुंबई काढून घेणार याची चाहूल लागली. त्यामुळे तेलही गेले आणि तुपही गेले हाती धुपाटणे फक्त शिल्लक राहण्याची वेळ आली अशी अवस्था पेंग्विन सेनेची झाली आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.
फडणवीसांसमोरील आव्हानांची सामनाच्या अग्रलेखातून पेंग्विन सेनेने चिंता करण्याची गरज नाही. महाराष्ट्रासमोरील आव्हाने काय आहेत याची पूर्ण कल्पना असलेले देवेंद्र फडणवीस हे नेते आहेत. ते आव्हांनाना निढळ्या छातीने सामोरे जातात. घरात बसून राहत नाहीत. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र फडणवीसांच्या पाठीशी आहे. सामनाच्या अग्रलेखात आता पेंग्विन सेनेसमोरील आव्हानांची जाहीर चर्चा करा. आज त्याची गरज आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
आमची रोखठोक सच्चाई! pic.twitter.com/YsCngiewVZ
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 22, 2022
बुलेट ट्रेनला विरोध करणारे, 44 अब्ज डॉलरची गुंतवणूक आणणाऱ्या नाणार प्रकल्पाला विरोध करणारे, 1 लाख कोटींची गुंतवणूक आणणाऱ्या जैतापूर प्रकल्पालाही विरोध करणारे, मेट्रोपासून कोस्टल रोडपर्यंत आणि मुंबईत पर्यावरणपूरक एलईडी दिवे लावताना सुध्दा विरोध, विरोध आणि विरोधाचा झेंडा फडकवणारी पेंग्विन सेना आज फॉक्सकॉन आणि वेदांताच्या नावाने गळे काढत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
आयना का बायना…घेतल्याशिवाय जायना! असे वागणाऱ्यांकडून सगळ्या टक्केवारीचा हिशेब मुंबईकरच मागत आहेत. मागणारच! 25 वर्षात 21 हजार कोटी खर्च करून मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे कसे? द्या हिशोब. 45 हजार कोटींचा अर्थसंकल्प कुठे खर्च होतो? द्या हिशोब. फॉक्सकॉन आणि वेदांताकडून किती मागितले? 10% की त्यापेक्षा जास्त?, असा सवाल त्यांनी केला.
होय, आम्ही टक्केवारी वाढवू मुंबईत मराठी माणसाची टक्केवारी वाढायचा प्रयत्न करू. पालिकेच्या मराठी शाळांची टक्केवारी वाढवू. तुम्ही मुख्यमंत्री झालात तेव्हा मराठी माणसासाठी किती “टक्के” काम केलेत त्याचा हिशेब द्या, असं आव्हानच त्यांनी केलं.
हसीना पारकर सोबत देवाणघेवाण, कसाबला बिर्याणी, याकूबच्या कबरीवर रोषणाई करणारे आता म्हणे, भाजपाचा कोथळा काढणार? वा रे वा! कसाब तुम्हाला खंजीर देऊन गेलाय की काय? भाजपाचा राजकीय कोथळा काढायला? ही औरंगजेबी भाषा आपल्या तोंडी शोभते का?, असा सवालही त्यांनी केला.