Ashish Shelar : मुंबई महापालिकेतील पितापुत्रांची सत्ता उलथवून टाकणार; आशिष शेलार यांचा निर्धार
Ashish Shelar : आताची जी खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहे, त्यांचंही तेच मत आहे. घराणेशाही नको आणि बरोबरीने सर्वांना उत्तम स्थान मिळावं ही त्यांची भूमिका आहे. लोकशाहीमध्ये भ्रष्टाचाराला स्थान नसावं, असं त्यांचं मत आहे.
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी आज दोन अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. एक म्हणजे देशातील भ्रष्टाचार समूळ नष्ट करणे आणि दुसरं म्हणजे घराणेशाही उखडून फेकणे. पंतप्रधान मोदी मुंबईकरांच्या मनातलच बोलले आहेत. येणाऱ्या काळात मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची बजबजपुरी उखडून फेकली पाहिजे. महापालिकेत (bmc) गेल्या 25 वर्षापासून एकाच कुटुंबाची सत्ता आहे. मी नाही तर माझा पुत्र अशा पद्धतीने पालिकेचा कारभार सुरू आहे. त्यामुळे पालिकेतील पितापुत्रांची सत्ता उलथवून टाकण्यात येईल, असं सांगतानाच महापालिकेत लोकशाही मूल्यावर आधारीत काम झालंच पाहिजे, असं भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सांगितलं. ते मीडियाशी संवाद साधत होते. मुंबई महापालिका निवडणूक आम्ही सर्व मिळून लढू आणि जिंकू असंही शेलार यांनी यावेळी स्पष्ट केलं.
मुंबई महापालिकेत भाजप 150 चा नारा देणार आहे का? असा सवाल आशिष शेलार यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. महापालिका निवडणुकीत नारा काय द्यायचा हे आम्ही सर्व मिळवून ठरवू. पण संपूर्ण बहुमतासाठीचं काम सुरू आहे. भ्रष्टाचार उखडून फेकणे आणि घराणेशाही संपुष्टात आणून लोकशाही मजबूत करण्यावर आमचा भर असेल. मुंबईकरांना विजयी करण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहोत, असं आशिष शेलार यांनी सांगितलं.
शिंदे-फडणवीस निर्णय घेतील
मुंबई महापालिकेत एकनाथ शिंदे गट आणि भाजप एकत्र येणार आहे का? असा सवालही त्यांना करण्यात आला. मात्र, त्यावर शेलार यांनी थेट उत्तर दिलं नाही. आताची जी खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आहे, त्यांचंही तेच मत आहे. घराणेशाही नको आणि बरोबरीने सर्वांना उत्तम स्थान मिळावं ही त्यांची भूमिका आहे. लोकशाहीमध्ये भ्रष्टाचाराला स्थान नसावं, असं त्यांचं मत आहे. महापालिकेमध्ये एकत्र येण्याबाबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील, असं त्यांनी सांगितलं.
सामना कागदाचा लगदा
दैनिक सामनातील टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. सामना हा केवळ टीका करण्यासाठी निर्माण केलेला कागदाचा लगदा आहे असं मला वाटतं. त्यांना जे म्हणायचे ते म्हणू द्या. गेल्या महिन्याभरात विकासाची निर्णय घेतलेले आहेत. खाते वाटपामुळे निर्णय अधिक पटापट घेतले जातील आणि जे सुशासन सुरू आहे, त्यालाही गती मिळेल असं मला वाटतं. विरोधकांना त्यांचं काम करणं स्वाभाविक आहे. पण देशातील आणि राज्यातील नागरिक त्यांचं म्हणणं ऐकायला तयार नाहीत, असंही ते म्हणाले.
देश उत्तुंग शिखरावर पोहोचेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासमोर असलेल्या समस्या, त्याचं निवारण, निराकरण आणि बरोबरीने जे आव्हान आहेत त्याबद्दल भाष्य केलं. या सर्व गोष्टींसाठी सर्व भारतीयांनी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं. आपला देश कसा विकास करेल आणि उत्तुंग शिखरावर कसा पोहोचेल याचं विवेचनही त्यांनी केलं, असं त्यांनी सांगितलं.