Atul Save | औरंगाबादेत शिंदे-भाजपची ताकद, महापालिका निवडणुकांचं आव्हान नाहीच, मंत्री होताच अतुल सावेंचं वक्तव्य!
आदित्य ठाकरेंचा नुकताच औरंगाबाद दौराही आयोजित करण्यात आला होता. असे असूनही औरंगाबादमध्ये आता शिवसेनेचं किंवा एमआयएमचं आव्हान आमच्यासमोर नाही, अशी प्रतिक्रिया अतुल सावे यांनी दिली आहे.
औरंगाबादः औरंगाबादमध्ये आता एकनाथ शिंदेंची (Eknath Shinde) शिवसेना आणि भाजपची ताकद असून आगामी महापालिका निवडणुका या आमच्यासाठी आव्हान नाहीच, असं वक्तव्य भाजप आमदार तथा नव नियुक्त मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी केलंय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या सरकारचा नुकताच मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात औरंगाबाद जिल्ह्याकडे तीन मंत्रिपदं आलेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिंदेसेना आणि भाजपची ताकद निश्चितच वाढली आहे. मागील अडीच वर्षांत औरंगाबादचा विकास रखडला होता. आता मंत्रिपद मिळाल्यानंतर शहरातील कोणतीही योजना रखडणार नाही तसेच विकास प्रकल्पांना गती दिली जाईल, असं आश्वासन अतुल सावे यांनी दिलंय. तसेच आता राज्यातील सत्तेत भाजप आल्याने आणि केंद्रातही भाजप सरकार असल्याने शहराच्या नामांतर प्रक्रियेला गती दिली जाईल, असं वक्तव्य अतुल सावे यांनी केलं.
‘औरंगाबादच्या विकासासाठी प्रयत्न करणार’
औरंगाबादेत शिंदे गटाचे संदिपान भूमरे आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळालंय. तसेच भाजपचे अतुल सावे यांनाही मंत्रिपद मिळाले आहे. महाविकास आघाडीच्या मागील अडीच वर्षांमध्ये औरंगाबादचा विकास रखडला होता. पाणीपुरवठा योजनेला राज्य सरकारने पुरेसा निधी दिला नाही. त्यानुले ही योजना प्रलंबित राहिली. मात्र आता राज्य सरकारकडून निधी आणून ही योजना पूर्णत्वास नेणार असल्याचं अतुल सावेंनी सांगितलं. तसेच येणाऱ्या अधिवेशनात औरंगाबाद शहराचे नाव बदलण्यासाठी ठराव मांडू आणि तो लवकरच केंद्रात पाठवण्यासाठी प्रयत्न करू, असेही अतुल सावे म्हणाले.
महापालिकेत शिंदे-भाजपाचाच विजय
शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या औरंगाबाद महापालिकेत एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे मोठी फूट पडली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील आमदारही शिंदेंच्या गटात शामिल झाले आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत तर जनतेने आपण शिंदे गटासोबत असल्याचं दाखवून दिलंय. निवडणुकीचं आव्हान ओळखून उद्धव ठाकरे गटाकडूनही शिवसैनिकांना नव्याने प्रोत्साहन दिले जात आहे. आदित्य ठाकरेंचा नुकताच औरंगाबाद दौराही आयोजित करण्यात आला होता. असे असूनही औरंगाबादमध्ये आता शिवसेनेचं किंवा एमआयएमचं आव्हान आमच्यासमोर नाही, अशी प्रतिक्रिया अतुल सावे यांनी दिली आहे. इम्तियाज जलील यांना खासदार होऊन तीन वर्षे झालीत, पण औरंगाबाद शहरासाठी काय योजना आणली हे सांगावं, असा सवालही सावेंनी केला. शिंदे सरकारमध्ये मंत्रिपद मिळालं आहे. त्यानंतर खातं कुठलंही मिळालं तरी जोमाने विकासकामं करीन, असा विश्वास सावे यांनी व्यक्त केला.