Aurangabad | औरंगाबादचे पालकमंत्री कोण? ध्वजारोहण करणाऱ्या मंत्र्याची चर्चा! सत्तार, सावे, भुमरेंमध्ये स्पर्धा
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोठं मंत्रिपद आणि औरंगाबादचं पालकमंत्री पद या दोहोंसाठी संजय शिरसाट यांची जबरदस्त चर्चा होती. मात्र ऐनवेळी सत्तार, भुमरे, सावेंचा नंबर लागल्याने शिरसाट यांचं नाव पहिल्या टप्प्यातील यादीतून वगळण्यात आलं.
औरंगाबादः विधानसभेचं पावसाळी अधिवेशन संपताच विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची घोषणा होणार आहे. त्यामुळे औरंगाबादचा पालकमंत्री (Aurangabad guardian Minister) कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मुंबई, ठाण्यानंतर शिवसेनेचा मोठा गड मानल्या जाणाऱ्या औरंगाबादला सध्या राजकीयदृष्ट्या प्रचंड महत्त्व प्राप्त झालंय. शिवसेनेच्या पाच आमदारांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाची वाट धरल्याने उद्धव ठाकरे गटाला मोठा हादरा बसलाय. एकनाथ शिंदे गटातील दोन आमदारांना तसेच भाजपच्या एका आमदाराला अशी औरंगाबादेत तीन मंत्रिपदं मिळाली आहेत. आता पालकमंत्रीपदासाठी आमदारांमध्ये स्पर्धा सुरु आहे. 15 ऑगस्ट रोजीचं ध्वजारोहण संदिपान भूमरे (Sandipan Bhumre) यांच्या हस्ते झाल्याने त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र भाजपचे अतुल सावे आणि शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनीही पालकमंत्री पदासाठी जोरदार लॉबिंग केल्याचं बोललं जातंय. तर पहिल्या टप्प्यात मंत्रिपद न मिळालेले संजय शिरसाट अजून वेटिंगवरच असल्याचं दिसतंय…
ध्वजारोहणामुळे भुमरे चर्चेत
नुकत्याच झालेल्या 15 ऑगस्ट रोजी मंत्री संदिपान भूमरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यामुळे संदिपान भुमरेंनाच पालकमंत्री होण्याचा मान दिला जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. मजबूत पक्ष संघटन आणि मूळ शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंना जोरदार टक्कर देण्यास सक्षम नेता म्हणून संदिपान भुमरेंकडे पाहिलं जातंय. त्यामुळे पालकमंत्री पदाच्या शर्यतीत भुमरेंचं पारडं अधिक जड असल्याचं दिसून येतंय.
सत्तारांचीही शक्यता…
औरंगाबादमधील एकनाथ शिंदे गटात संदिपान भुमरेंच्या तुल्यबळ नेता म्हणून अब्दुल सत्तार यांच्याकडे पाहिलं जातं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या औरंगाबाद दौऱ्यात सत्तार यांनी सिल्लोडमध्ये मोठं शक्तिप्रदर्शन केलं होतं. अनेकदा पक्ष बदलूनही मोठा कार्यकर्ता वर्ग पाठिशी असल्यामुळे एक वजनदार राजकीय नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मंत्रिमंडळ विस्तारावेळी दोन दिवस आधीच टीईटी घोटाळ्यात नाव आल्यामुळे सत्तारांना मंत्रिपद मिळण्याचीच शक्यता कमी होती. त्यातही कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने विरोधकांनी जोरदार टीका केली. त्यामुळे सक्षम असूनही विरोधकांची टीका ओढवू नये, यासाठी सत्तार हे पालकमंत्री होण्याची शक्यता काहीशी कमी वाटते.
भाजपचा पालकमंत्री नाही?
एकनाथ शिंदेंच्या गटाला बळ देणारे पाच आमदार औरंगाबाद शिवसेनेतून गेल्यामुळे यंदा औरंगाबादचा पालकमंत्री हा शिवसेनेचाच होणार, असं बोललं जातंय. भाजपकडून मंत्रिपद मिळालेले आमदार अतुल सावे यांच्याही नावाची पालकमंत्रीपदासाठी चर्चा आहे, मात्र औरंगाबादेत शिंदेसेना-भाजप युती मजबूत ठेवायची असेल तर हे पद शिंदे गटाकडे देणं, भाजपसाठी अधिक योग्य होईल, असा एक सूर उमटतोय.
शिरसाट अजून वेटिंगवरच…
मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोठं मंत्रिपद आणि औरंगाबादचं पालकमंत्री पद या दोहोंसाठी संजय शिरसाट यांची जबरदस्त चर्चा होती. मात्र ऐनवेळी सत्तार, भुमरे, सावेंचा नंबर लागल्याने शिरसाट यांचं नाव पहिल्या टप्प्यातील यादीतून वगळण्यात आलं. यामुळे नाराज असलेले संजय शिरसाट यांच्या मनातील खदखद अनेकदा माध्यमांतून व्यक्तही झाली. मात्र पहिल्या टप्प्यात मंत्रिपदच न मिळाल्याने संजय शिरसाट हे पालकमंत्री पदाच्या शर्यतीतून सध्या तरी बाजूलाच आहेत. दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर काही समीकरणं बदलली तर कदाचित ही संधी शिरसाट यांना मिळू शकते, असे राजकीय जाणकार सांगतायत.
पहिल्यांदाच पालकमंत्री औरंगाबादचा…
सत्तार, सावे, भुमरे किंवा शिरसाट यापैकी कुणीही पालकमंत्री झाले तरी यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा प्रथमच औरंगाबादला जिल्ह्यातीलच पालकमंत्री मिळणार आहे. याआधी सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदेंच्या रुपाने औरंगाबाद बाहेरचे पालकमंत्री लाभले होते.