Raj Thackeray VIDEO | कोंबडा झाकून ठेवला तरी सूर्य उगवतोच, सभांना आडकाठी करून उपयोग नाही, राज ठाकरेंचा औरंगाबादेत इशारा
माझ्या सभांना कितीही अडवा, मी काही बोलायचं थांबणार नाही. मी कुठेही राहून बोललो तरीही ते लोकांपर्यंतच पोहोचणार, त्यामुळे सभांना विरोध करून उपयोग नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी विरोधकांना दिला.
औरंगाबादः कोंबडं झाकायचं ठरवलं तरी सूर्य काही उगवायचं थांबत नाही. सूर्य उगवतोच, त्यामुळे माझ्या सभांना आडकाठी करून काहीच उपयोग नाहीस असा इशारा राज ठाकरे यांनी विरोधकांना दिला आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज औरंगाबाद येथे सभा घेताना सुरुवातच या विषयाने केली. माझ्या सभांना कितीही अडवा, मी काही बोलायचं थांबणार नाही. मी कुठेही राहून बोललो तरीही ते लोकांपर्यंतच पोहोचणार, त्यामुळे सभांना विरोध करून उपयोग नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी विरोधकांना दिला. औरंगाबादमधील (Aurangabad) राज ठाकरे यांच्या सभेलाही 15 पेक्षा जास्त संघटनांनी विरोध केला होता. पोलिसांनीदेखील सभेला परवानगी द्यायची की नाही, हा निर्णय घेण्यासाठी अनेक दिवस घेतले. अखेर राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळाली.
‘मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात सभा घेणार’
ठाण्यातील सभेनंतर औरंगाबादला सभा घ्यायचं कसं ठरलं, याविषयी सांगताना राज ठाकरे म्हणाले, ‘ दिलीप धोत्रेंनी सांगितलं संभाजीनगरला सभा घेऊया. संभाजी नगर हा तर महाराष्ट्राचा मध्य. मग मी त्याला सांगितलं. सभा घेऊ. पण तारीख सांगतो नंतर. हा विषय संभाजीनगर पुरता मर्यादित नाही. या पुढच्या सर्व सभा मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार. विदर्भातही जाणार. कोकणात,. उत्तर महाराष्ट्र ाइणि पश्चिम महाराष्ट्रातही जाणार आहे. या सभांना आडकाठी आणून काही फायदा नाही. मी कुठेही बोललो तरी लोकांपर्यंत पोहोचणार आहे. कोंबडं झाकायचं ठरवलं तरी सूर्य उगवायचं थोडचं राहतं.. असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
‘जो इतिहास विसरला, त्याचा भूगोल सरकला’
महाराष्ट्राच्या किंबहुना औरंगाबादच्या इतिहासाची आठवण करून देताना राज ठाकरे म्ङणाले, ‘ महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. मला त्यांची कल्पना आहे. पाण्याचा प्रश्न आहे. सर्व प्रश्न प्रलंबित आहेत. त्याची मला कल्पना आहे. पण आजचे जे काही प्रमुख विषय आहेत. ते धरून मी बोलणार आहे. संभाजीनगरचं मूळ नाव खडकी. आपल्या दोन्ही राजधान्या इथल्याच. एक देवगिरीचा किल्ला आणि त्याच्या आगोदरची आमची पैठण. मला वाटतं महाराष्ट्र दिन एक मे साजरा करताना महाराष्ट्र नीट समजून घेणं गरजेचं आहे. महाराष्ट्रच समजून घेतला नाही… जो जो समाज इतिहास विसलरला त्याच्या पायाखालची जमीन सरकली, भूगोल सरकला. त्यामुळे महाराष्ट्र समजून घेणं गरजेचं आहे.