उद्या राजीनामा द्यावा लागला तरी बेहत्तर, आंडूपाडू थोडीच आहे? उद्वेग, संताप आणि निर्वाणीचा इशारा; शिंदे सरकारचा आमदार का भडकला?
धनुष्यबाणवाले आणि अपक्ष दोन्ही आमदार नाराज आहेत. ते संपर्कात आहेत. हा सोबतचा विषय नाही. हा विषय फक्त आरोपाचा आहे. सरकारचा पाठिंबा काढण्याचा विषय नाही.
नागपूर: खोक्यांच्या मुद्द्यांवरून राज्य सरकारमधील दोन आमदारांमध्ये (MLA) आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. आमदार रवी राणा (ravi rana) यांच्या आरोपावर आमदार बच्चू कडू (bacchu kadu) यांनी दंड थोपाटले आहेत. या प्रकरणात बच्चू कडू गेल्या तीन दिवसांपासून राज्य सरकारला वारंवार इशारा देत आहेत. आता तर त्यांनी 1 नोव्हेंबर रोजी मोठा बॉम्बच फोडणार असल्याचा इशारा दिला आहे. बॉम्ब कुठे आणि कसा फोडायचा हे आपल्याला बरोबर माहीत आहे, असं सांगतानाच उद्या राजीनामा द्यावा लागला तरी बेहत्तर. आता आरपारची लढाई लढणार, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे. बच्चू कडू यांनी आज उद्वेग, संताप व्यक्त करतानाच सरकारला गर्भित इशाराही दिला आहे.
बच्चू कडू यांनी नागपूरहून मुंबईला रवाना होण्यापूर्वी टीव्ही9 मराठीसोबत खास बातचीत करत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला. माझा इशारा हा फुसका बार आहे की बॅाम्ब आहे, हे 1 तारखेला दाखवू. हा बॉम्ब कसा कुणाच्या खाली लावायचा हे बच्चू कडूला चांगलं माहीत आहे. बॉम्ब कसा आहे हे 1 तारखेला कळेल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत बोलायला हवं, नाही तर आम्ही आमचं काम करू. अस्तित्वंच धोक्यात येत असेल तर मग याचं काय करणार? असा सवाल बच्चू कडू यांनी केला.
तक्रारीची दखल घेतात नाही घेत यांचं मला काही घेणं नाही. फिकर नाही. मी नंगा होईल. बच्चू कडूंचं राजकारण चुलीत गेलं तरी बेहत्तर. राजकारण सोडावं लागलं तरी बेहत्तर. उद्या राजीनामा द्यावा लागला तरी बेहत्तर. एकदा आमच्या डोक्याच्या बाहेर गेल्यानंतर आम्ही आरपारची लढाई करतो. तुम्ही चुकीच्या पद्धतीने आरोप करत असाल तर आम्ही आंडूपांडू थोडीच आहोत. आम्ही शेतकरी आहोत. जिथं मोकळं रान आहे तिथे नांगर घालू, असा इशारा त्यांनी दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी फोन केला होता. त्यांच्या कानावर टाकलं. त्यानंतरही राणांचे आरोप सुरूच होते. सांगूनही ते ऐकत नव्हते. म्हणून मी पत्रकार परिषद घेऊन त्यांनाइशारा दिला. माझ्याकडे पर्याय नव्हता, असं ते म्हणाले.
कालही शिंदे यांचा फोन आला. आज देवेंद्र फडणवीसांशी बोलतो असं शिंदेंनी सांगितलं. मी म्हटलं मी आधी बोललो नाही. त्यांनी आधी आरोप केला आहे. मी नंतर बोललो. मी त्यांचं नाव घेऊन कधीच बोललो नाही. मी भाषणात बोललो होतो. लोकशाहीचं पतन होऊ नये. किराणा, चिकन, मटणचं वाटप होऊ नये. बाबासाहेबांनी मतांचं महत्त्व सांगितलं आहे. मताची किंमत पीठ आणि मिठासारखी असू नये असं बाबासाहेब म्हणाले होते. याला का लागलं माहीत नाही. मीही गेल्या अनेक वर्षापासून किराणा वाटतो. अनेक लोक किराणा वाटतात, असं त्यांनी सांगितलं.
हा आरोपाचा विषय आहे. सरकार आणि सत्तेचा विषय नाही. हा राणांच्या आरोपाचा विषय आहे. राणा म्हणजे सरकार नाही. त्यांचा सरकारशी काय संबंध आहे? हा मंत्रिपदाच्या वरचा विषय आहे. मी दहावेळा तेच सांगतो. हा मंत्रिपदाचा विषय नाही. हा अस्तित्वाचा विषय आहे. मीच नाही तर मंत्रिपद काय कामाचं? असा सवाल त्यांनी केला.
धनुष्यबाणवाले आणि अपक्ष दोन्ही आमदार नाराज आहेत. ते संपर्कात आहेत. हा सोबतचा विषय नाही. हा विषय फक्त आरोपाचा आहे. सरकारचा पाठिंबा काढण्याचा विषय नाही. मीडियात वेगळं दाखवतं हा भाग वेगळा आहे. हा फक्त आरोपाचा विषय आहे. तो आरोप गंभीर आहे, असं त्यांनी सांगितलं.