Bihar Cabinet Expansion : नितीश कुमारांच्या ‘सुपर 31’मध्ये मुस्लिम आणि यादवांना रेड कार्पेट, सोशल इंजीनियरिंग की आणखी काही?; जाणून घ्या सविस्तर!
Bihar Cabinet Expansion : नितीश कुमार यांनी आपल्या मंत्रिमंडळात जातीय समीकरणावर अधिक भर दिला आहे. नव्या सरकारमध्ये नितीश कुमार यांनी 8 यादव समाजातील मंत्र्यांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. यात आरजेडीने यादव समाजातील सात आणि जेडीयूने एका मंत्र्याला स्थान दिलं आहे.
पाटणा: राज्यात सत्तांतर घडवून आणल्यानंतर अखेर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारचा विस्तार (Bihar Cabinet Expansion) झाला आहे. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील एकूण 31 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला आहे. त्यानंतर नितीश कुमार (nitish kumar) यांनी खातेवाटपही जाहीर केलं आहे. राज्यातील सर्वच्या सर्व 31 मंत्र्यांची खाती जाहीर करण्यात आली आहेत. त्यानुसार नितीश कुमार यांनी स्वत:कडे गृहखातं ठेवलं आहे. तर उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना आरोग्य खातं दिलं आहे. नव्या सरकारमध्ये मुस्लिम (muslim) आणि यादव समाजाला रेड कार्पेट अंथरण्यात आलं आहे. पहिल्या विस्तारात यादव समाजातील 8, मुस्लिम समाजातील 5 आणि तीन महिलांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली आहे. राज्यपाल फागू चौहान यांनी राजभवन येथे पार पडलेल्या छोटेखानी समारंभात या मंत्र्यांना शपथ दिली आहे.
नितीश कुमार यांनी आपल्या मंत्रिमंडळात जातीय समीकरणावर अधिक भर दिला आहे. नव्या सरकारमध्ये नितीश कुमार यांनी 8 यादव समाजातील मंत्र्यांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. यात आरजेडीने यादव समाजातील सात आणि जेडीयूने एका मंत्र्याला स्थान दिलं आहे. नितीश कुमार यांनी कुर्मी जातीच्या एका आमदारालाही मंत्री बनवलं आहे.
दलितांना सत्तेचा सर्वाधिक वाटा
नव्या सरकारमध्ये दलित समाजातील 6 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. नव्या सरकारमध्ये दलित समाजाला सत्तेचा मोठा वाटा देण्यात आला आहे. यात राजद आणि जेडीयूने प्रत्येकी दोन आणि एचएम तसेच काँग्रेसने प्रत्येकी एका दलित आमदाराला मंत्री केलं आहे. तसेच राजपूत समाजातील तिघांना मंत्रीपद देण्यात आलं आहे. आरजेडी, जेडीयू यांनी राजपूत समाजातील प्रत्येकी एक आणि अपक्षातून एका राजपूत आमदाराला मंत्री करण्यात आलं आहे.
भूमिहार आणि मागास समाजालाही संधी
भूमिहार जातीच्या दोन आमदारांनाही मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. आरजेडी आणि जेडीयूने प्रत्येकी एका भूमिहार जातीच्या आमदाराला मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. तर जेडीयूकडून ब्राह्मण समुदायातील एका आमदाराला कॅबिनेट मंत्री केलं आहे. मागास आणि अतिमागास समाजालाही नव्या सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात आले आहे. कुशवाहा समुदायातील तीन आणि अति मागास समाजातील तीन मंत्र्यांनाही मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे.
सोशल इंजीनियरिंगचा डाव
दरम्यान, सर्वच पक्षांनी मुस्लिम समुदायाला चांगलं प्रतिनिधीत्व दिलं आहे. नितीश कुमार सरकारमध्ये मुस्लिम समुदायातून पाच मंत्री करण्यात आले आहेत. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यासह नितीश कुमार सरकारमधील मंत्र्यांची संख्या 33 झाली आहे. नितीश कुमार आणि तेजस्वी यादव यांनी मंत्रिपदे देताना सोशल इंजीनियरिंगवर अधिक भर दिला आहे. तसेच 2024च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नितीश कुमार यांनी आपला पहिला डाव टाकल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, त्याला कसं यश येतं हे येत्या काळात दिसून येणार आहे.