उद्धव ठाकरे म्हणाले, फडणवीस फडतूस, फडणवीस यांनीही ‘असं’ काढलं बंदुकीचं ‘काडतूस’
ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना 'फडतूस' असा शब्दोच्चार केला. त्यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
नागपूर : महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीची नेहमी चर्चा होत असते. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्यापासून वसंतराव नाईक, बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे सारखे दिग्गज नेते लाभली आहेत. या नेत्यांनी महाराष्ट्राची एक राजकीय संस्कृती जपली आहे. या बाबतीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचंदेखील नाव आदराने घेतलं जातं. पण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनपेक्षित अशी आक्रमकता वाढत चालली आहे. एवढ्या तेवढ्या गोष्टींवरुन राजकीय राड्याच्या घटना घडत आहेत. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते थेट हाणामारीपर्यंत पोहोचत आहेत. ठाण्यात तेच दोन दिवसांत पाहायला मिळालं.
ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आल्यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ‘फडतूस’ असा शब्दोच्चार केला. फडणवीस फडतूस गृहमंत्री आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलेली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी “उद्धव ठाकरे फडतूस नहीं काडतूस हुँ मैं”, अशा शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. ते नागपुरात सावरकर गौरव यात्रेत बोलत होते.
‘उद्धव ठाकरे फडतूस नहीं काडतूस हुँ मैं’
“आज ते मला म्हणाले फडतूस गृहमंत्री. उद्धव ठाकरे फडतूस नहीं काडतूस हुँ मैं, झुकेगा नहीं साला घुसेंगा. सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत राहणाऱ्यांबद्दल माझ्या मनात यथकिंचीतही सन्मान राहू शकत नाही. सावरकर गौरव यात्रा तोपर्यंत सुरु राहील जोपर्यंत सडक्या आणि कुचक्या मेंदुचे लोकं सावरकरांचा अपमान करत राहतील तोपर्यंत सावरकर प्रेमींची यात्रा सुरु राहील”, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं.
“तुम्ही मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या मुखपत्राने लेख चापला. म्हणाले, स्वातंत्र्यवीर नाही माफीवीर, सावकरांनी बलात्कार केला होता, इतकं भयानक लिहिलं होतं. पण यांना खुर्चीची चिंता होती. साधा निषेध सुद्धा केला नाही. ते ज्यावेळेस महाराष्ट्रात आले त्यावेळेस त्यांच्या गळ्यात गळे घालून त्यांच्यासोबत पायी चालत होते. म्हणून म्हटलं कोण होतास तू काय झालास तू…”, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.
“मला आश्चर्य वाटतं, ते परवाच्या सभेत बोलले मला चालणार नाही. रोज सावरकरांना शिव्या दिल्या जात आहेत आणि त्यांच्याच गळ्यात गळे मिळवून तुम्ही चालला आहात. इतिहास बघतोय. सत्ता येईल, सत्ता जाईल. पण इतिहासात तुमचं नाव सावरकरांचा विरोध करणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावणाऱ्यांमध्ये असेल”, असा घणाघात फडणवीसांनी केली.