किरीट सोमय्या यांचा मोठा दावा, ठाकरे कुटुंबियांच्या अडचणी वाढणार?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आमदार राहुल कुल यांच्यावर भीमा पाटस साखर कारखान्यात 500 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केलाय. संजय राऊत राहुल कुल यांच्या मतदारसंघात जावून सभा घेऊन आले. त्यानंतर आता दुसऱ्याच दिवशी किरीट सोमय्या यांनी ठाकरे कुटुंबाबद्दल मोठा दावा केला आहे.
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी रायगडच्या कोर्लई गावातील कथित 19 बंगल्यांच्या घोटाळ्या प्रकरणी मोठा दावा केला आहे. ठाकरे कुटुंबाविरोधातील कथित 19 बंगल्यांच्या घोटाळ्याची फाईल आता मिळाली आहे. त्यामुळे याबाबत मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबियांच्या अडचणी वाढणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रायगड जिल्ह्यातील कोर्लई गावात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्या नावाने 19 बंगले अधिकृतपणे बांधण्यात आले होते. पण नंतर आरोप करण्यात आल्यानंतर संबंधित बंगले जमीनदोस्त करण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय.
या आरोपांप्रकरणी सध्या पोलिसांची चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी रेवदंडा पोलिसांनी कोर्लई गावातील माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक केली होती. 19 बंगल्याच्या फसवणुकी प्रकरणात पोलिसांनी ही मोठी कारवाई केली होती. या प्रकरणी सोमय्यांच्या तक्रारीनंतर रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आलेली. या प्रकरणी आता ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण सोमय्यांनी या प्रकरणाची हरवलेली फाईल आपल्याला साडल्याचा दावा केला आहे.
किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले?
किरीट सोमय्या यांनी आपला एक व्हिडीओ जारी करत याबाबत आपली भूमिका मांडली आहे. “ठाकरे परिवाराची 19 बंगल्यांची गायब झालेली फाईल आता मला सापडली आहे. 80 पानांच्या या गायब फाईलीची गोष्ट मी उद्या सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेत सांगणार”, असं किरीट सोमय्या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या आता काय आरोप करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नेमके आरोप काय?
“रश्मी उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात जमिनीचे व्यवहार झाले आहेत. रश्मी ठाकरे यांच्या नावावर कोकणात 19 बंगले होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेचा गैरवापर करत रश्मी ठाकरे यांचे नाव त्या व्यवहारातून कमी केले”, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. सोमय्यांनी याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती.
“रश्मी ठाकरे यांच्या जमीन व्यवहाराची कागदपत्रे गहाळ करण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी या जमीन व्यवहाराचे कागदपत्रे गहाळ करायला लावले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास झाला पाहिजे”, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती.
किरीट सोमय्या यांनी याप्रकरणात थेट रश्मी ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. ते 19 बंगले रश्मी ठाकरे यांच्या नावावर होते, असा आरोप सोमय्या यांनी केलाय. सोमय्या यांनी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. त्यापैकी अनेकांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीच्या ससेमिऱ्याला सामोरं जावं लागलं आहे. अनेकांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे आता सोमय्यांनी कोर्लई येथील 19 बंगल्यांच्या आरोपाप्रकरणी माजी सरपंचाला अटक केल्यामुळे आता या प्रकरणी पोलिसांचा तपास रश्मी ठाकरे यांच्या नावापर्यंत येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.