राज्यसभा निवडणुकीबाबत हालचाली वाढल्या, फडणवीस दिल्लीत, निवडणूक बिनविरोध होणार ?
maharashtra 6 rajya sabha seat election | भाजप राज्यसभेत सहा पैकी तीन जागांवर उमेदवार देणार आहेत. परंतु चौथी जागा दिल्यास त्या जागेसाठी उमेदवार कोण असावा? याबाबत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्याशी बैठकीत चर्चा केली.
नवी दिल्ली, दि.2 फेब्रुवारी 2024 | राज्यसभा निवडणूक जाहीर झाली आहे. लोकसभेआधी राज्यसभेची निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाने 27 फेब्रुवारी रोजी या ठिकाणी मतदान घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. 29 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यसभा निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीत रवाना झाले. त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. या भेटीत ही निवडणूक बिनविरोध करावी की चौथी जागा भाजपने लढवावी, याबाबत चर्चा झाली.
काय झाली चर्चा
देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची नवी दिल्लीत जाऊन भेट घेतली. गुरुवारी रात्री भेट झाली. यासंदर्भात ट्विट फडणवीस यांनी केले. त्याचे फोटो व्हायरल झाले आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजप तीन उमेदवार देणार आहेत. परंतु चौथी जागा लढवावी का? यावर बैठकीत चर्चा झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. या निवडणुकीत भाजप ३, अजित पवार यांची राष्ट्रवादी १ तर शिंदे यांची शिवसेना १ जागेवर आपला उमेदवार निवडून आणू शकणार आहे. भाजपला चौथी जागा लढवण्यासाठी महाविकास आघाडीतील मते फोडावी लागणार आहे. यामुळे ही निवडणूक बिनविरोध करावी का? यावर बैठकीत चर्चा झाली.
महाराष्ट्रात लोकसभेच्या तयारीवर चर्चा
लोकसभेची निवडणूक एप्रिल महिन्यात होणार आहे. या निवडणुकीची तयारी भाजपकडून करण्यात आली आहे. महायुतीच्या मित्रांपक्षांबरोबर जागा वापटबाबत चर्चा सुरु झाली आहे. राज्यातील ४८ मतदार संघावर महायुतीने कशी पद्धतीने लक्ष केंद्रीत केले आहे, त्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी नड्डा यांना दिली.
उमेदवारांच्या नावावर चर्चा
भाजपचे विद्यमान खासदार नारायण राणे, प्रकाश जावडेकर, व्ही व्ही मुरलीधरन हे तीन खासदार निवृत्त होणार आहेत. नारायण राणे यांना राज्यसभेसाठी लोकसभेवर पाठवण्याची चर्चा भाजपमध्ये सुरु आहे. भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि बिहारमधील सत्तांतर यशस्वी करणारे विनोद तावडे यांना राज्यसभेचे बक्षीस मिळण्याची चर्चा आहे. तसेच राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या नावांची चर्चा आहे. चौथी जागा दिल्यास त्या जागेसाठी उमेदवार कोण असावा? याबाबत बैठकीत चर्चा झाली.
हे ही वाचा…
महाराष्ट्रात भाजपकडून कोणाला मिळणार खासदारकीचे बक्षीस, ही नावे चर्चेत