Devendra Fadnavis: एकनाथ शिंदेंसोबतच्या 12 बंडखोरांचं निलंबन होऊ शकतं की नाही? फडणवीसांच्या बंगल्यावर बैठकांचा जोर, नेमक्या कोणत्या गोष्टीवर खल?
मुंबईत देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला आणि दिल्लीत अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात होत असलेल्या बैठकांच्या सत्रावरून भाजपच्या गोटातही मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरु असल्याचं चित्र आहे.
मुंबईः शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी विधानसभा उपाध्यक्षांकडे शिवसेनेच्या 12 आमदारांचं निलंबन करण्याविषयीचं पत्र दिलंय. या पत्रानंतर आमदारांचं निलंबन (MLA Suspension) रद्द होऊ शकतं का, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. या कारवाईतील कायदेशीर पेच काय आहेत.. असं घडलं तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला हा मोठा झटका बसू शकतो, या गोष्टींवर सध्या भाजपच्या बैठकीतही खल सुरु आहे. मुंबईतील विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या सागर बंगल्यावर सध्या भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीला रवी राणा, आशिष शेलार आदी नेते उपस्थित आहेत. विधान परिषद निवडणुकांपासून एकनाथ शिंदेंच्या बंडापर्यंत भाजपने आतापर्यंत काहीही प्रतिक्रिया थेटपणे दिलेली नाही. मात्र मुंबईत देवेंद्र फडणवीसांचा सागर बंगला आणि दिल्लीत अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात होत असलेल्या बैठकांच्या सत्रावरून भाजपच्या गोटातही मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरु असल्याचं चित्र आहे. आता बंडखोर आमदारांवरील कारवाईवरून भाजपकडून काही कायदेशीर उपाय सुचवला जातोय का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सागर बंगल्यावर हालचालींना वेग
एकनाथ शिंदे गटातील आमदारांचं निलंबन कसं रद्द करता येईल, यातील कायदेशीर पेच काय आहेत, यावर विचार मंथन करण्यासाठी भाजपच्या गोटातही आज बैठकांचं सत्र सुरु आहे. आज सकाळपासूनच देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची वर्दळ आहे. तर दिल्लीत मोदी आणि अमित शहा यांच्यात काल अडीच तास बैठक झाली आहे. बैठकीतही महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आमदारांवर कारवाई का?
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे ४० पेक्षा जास्त आमदार पळवल्यानंतर शिवसेनेने कायदेशीर शस्त्र उगारलं आहे. आमदारांची पळवापळवी सुरु झाल्यानंतर शिवसेनेचे प्रतोद सुनिल प्रभू यांनी बुधवारी शिवसेनेच्या सर्व आमदारांना ई मेल द्वार नोटिसा पाठवून तातडीच्या बैठकीला हजर राहण्यासाठी व्हीप जारी केला होता. मात्र बंडखोर आमदारांपैकी एकही जण उपस्थित राहिला नव्हता. त्यामुळे शिवसेनेचे नूतन गटनेते अजय चौधरी, उपनेते खासगार अरविंद सावंत यांनी झिरवाळ यांची गुरुवारी भेट घेतली. यात 12 आमदारांवर कारवाईची मागणी केली. त्यावर एकनाथ शिंदे यांनी तातडीने 37 आमदारांच्या सह्यांचं पत्र झिरवाळ यांना पाठवलं. त्यानुसार, पक्षाचे दोन तृतीयांश सदस्य आमच्याकडे असल्यामुळे सुनील प्रभू यांचा व्हीप आम्हाला लागू होत नाही. गटनेतेपदी एकनाथ शिंदे हेच कायम असून मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची निवड 21 जून रोजी केली होती, असं शिंदे गटाचं म्हणणं आहे.
रडारवर कोण-कोण?
शिवसेनेनं ज्या आमदारांवर कारवाईसाठी पत्र दिलंय त्यांची नावं पुढीलप्रमाणे- एकनाथ शिंदे, महेश शिंदे, अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, भरत गोगावले, संजय शिरसाट, यामिनी जाधव, लता सोनवणे, अनिल बाबर, बालाजी किणीकर, तनाजी सावंत, प्रकाश सुर्वे
एकनाथ शिंदे गटाला पहिला झटका
दरम्यान विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी काल दुपारीच शिवसेनेचे गटनेते म्हणून अजय चौधरी व मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभूी यांना मान्यता दिली आहे. एकनाथ शिंदे गटासाठी हा मोठा आणि पहिला झटका आहे. मात्र
तज्ज्ञांचं काय म्हणणं?
व्हीप हा सभागृहातल्या कामकाजासाठी असतो. त्याबाहेर एखादा पक्ष बैठक घेत असेल तर त्यासाठी व्हीपची गरज नसते. त्यामुळे अशा बैठकांमुळे आमदारांचं सदस्यत्व रद्द होऊ शकत नाही. अर्थातच हा निर्णय उपाध्यक्षांचा असतो.