Ganpat Gaikwad : भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी राजकारणात सक्रिय
Ganpat Gaikwad : कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्यापत्नी राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. गणपत गायकवाड हे गोळीबार प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी आता त्यांच्या पत्नीकडून विविध विकासकामांंचं भूमिपूजन होत आहेत. त्यामुळे येणाऱ्या निवडणुतकीत सुलभा गायकवाड निवडणूक लढवणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सुनील जाधव, कल्याण : भाजप आमदार गणपत गायकवाड सध्या न्यायालयीन कोठडीत असताना त्यांच्या पत्नी सुलभा गायकवाड राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात ते आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. यासोबतच त्यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन केले आहे. आमदार गणपत गायकवाड जर राजकारणात सक्रिय झाले नाही तर त्यांच्या पत्नी आता राजकारणात सक्रिय होतील अशी चर्चा आहे.
दरम्यान आज हीललाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार प्रकरणात गणपत गायकवाड यांना पुन्हा १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
सुलभा गायकवाड राजकारणात सक्रिय
हीललाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहराध्यक्ष महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणात गणपत गायकवाड हे न्यायालयीन कोठडीत आहेत. असं असताना कल्याण पूर्वेच्या विधानसभा मतदारसंघात आमदार गायकवाड यांच्या पत्नी अचानक सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या एक आठवडाभरापासून मतदारसंघामध्ये त्यांनी जनसंपर्क वाढवला आहे. भाजपा कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसोबत त्यांच्या भेटीगाठी घेणं सुरु आहे.
विकासकामांचे भूमिपूजन
मतदारसंघातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. आज कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील आशेळे पाडा भागात देखील भाजपा कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने त्यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन केले. गणपत गायकवाड यांच्यानंतर आपण राजकारणात सक्रिय राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपर्यंत गणपत गायकवाड जर राजकारणात सक्रिय झाले नाहीत तर मात्र त्यांच्या पत्नी या विधानसभा मतदारसंघाच्या दावेदार असतील अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.
गणपत गायकवाड हे गेल्या १५ वर्षांपासून कल्याण पूर्व मतदारसंघातून निवडून येत आहेत. या मतदारसंघात त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. गणपत गायकवाड हे दोन वेळा अपक्ष तर एक वेळा भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. दर रविवारी जनता दरबाराच्या माध्यमातून ते लोकांच्या समस्या सोडवण्याचे काम करत होते. याशिवाय अनेक सामाजिक कामात देखील ते पुढे होते. त्यामुळे या काळात त्यांनी मोठा जनसंपर्क या माध्यमातून तयार केला आहे.