जिल्हा परिषद सदस्य ते केंद्रीय मंत्री, जाणून घ्या डॉ. भारती पवारांचा राजकीय प्रवास
Bharti Pawar | भारती पवार यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्या पक्षात अगदीच नवख्या होत्या. त्यामुळे मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात भारती पवार यांना संधी मिळणे, राजकीय जाणकारांसाठी आश्चर्याचा धक्काच होता.
मुंबई: मोदी सरकारच्या बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तारात अनपेक्षितपणे स्थान मिळाल्यामुळे डॉ. भारती पवार (Bharti Pawar) हे नाव महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रकाशझोतात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपमधील सामर्थ्यशाली नेत्यांना डावलून बाहेरून आलेल्या भारती पवार यांची थेट केंद्रीय आरोग्य मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्ती केली होती.
पंतप्रधान मोदी यांच्या या निर्णयामुळे साहजिकच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे आता आगामी काळात डॉ. भारती पवार स्वत:ला कशाप्रकारे सिद्ध करुन दाखवणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत देखील लाखांच्या घरात मतदान घेणाऱ्या भारती पवार या माजी मंत्री आणि शरद पवारांचे निकटवर्तीय ए टी पवार यांच्या स्नुषा आहेत.
कोण आहेत भारती पवार?
भारती पवार यांचा जन्म 13 सप्टेंबर 1978 रोजी नाशिकमध्ये झाला. त्यांचे शिक्षण नाशिकमध्येच पूर्ण झाले. त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे. भारती पवार या आधी राष्ट्रवादीमध्ये होत्या. नंतर त्या भाजपात आल्या. तब्बल 8 वेळा आमदार आणि शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते ए. टी. पवार यांच्या त्या स्नुषा (सून) आहेत.
अभ्यासू व्यक्तिमत्व आणि दांडगा जनसंपर्क
भारती पवार यांनी जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून ग्रामीण भागात अनेक वर्षे काम केले आहे. त्या सुरुवातीपासूनच अभ्यासू नेत्या म्हणून ओळखल्या जातात. जिल्हा परिषद सदस्य म्हणून भारती पवार यांनी कुपोषणाच्या समस्येवर काम केले होते. या काळात त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला चांगलेच धारेवर धरले होते. अभ्यासू वृत्ती आणि संघटन कौशल्याच्या जोरावर भारती पवार यांनी अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
भारती पवार यांचा राजकीय प्रवास
भारती पवार या दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी दिंडोरी परिसरात अनेक वर्ष काम केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात भारती पवार यांचा दांडगा जनसंपर्क आहे. भाजपमध्ये येण्यापूर्वी भारती पवार या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत्या. त्या सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्तीय नेत्यांपैकी एक होत्या. या काळात भारती पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेतही डॉ. भारती पवार यांनी लाखांच्या घरात मते मिळवली होती. नंतरच्या काळात राष्ट्रवादीत योग्य सन्मान न मिळाल्याने भारती पवार नाराज होत्या. याच नाराजीतून 2019 साली भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेचा उमेदवार आयात केल्याने ग्रामीण भागात भारती पवारांना मोठी सहानुभुती मिळाली. याच जोरावर भारती पवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. गेल्या दोन वर्षांमध्ये भाजपचे पाठबळ मिळाल्याने भारती पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करत स्वत:चे स्थान आणखी भक्कम केले.
मोदींकडून अनपेक्षित संधी, फोनवर मराठीतून संवाद
भारती पवार यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्या पक्षात अगदीच नवख्या होत्या. त्यामुळे मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात भारती पवार यांना संधी मिळणे, राजकीय जाणकारांसाठी आश्चर्याचा धक्काच होता. या मंत्रिमंडळ विस्तारासाठी प्रीतम मुंडे, हिना गावित, रक्षा खडसे या महिला नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र, शेवटच्या क्षणी या सगळ्यांना बाजूला सारत डॉ. भारती पवार यांनी बाजी मारली होती. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच भारती पवार यांना दूरध्वनीवरुन मंत्रिमंडळात निवड झाल्याचे सांगितले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्याशी मराठीत संवाद साधत आस्थेवाईकपणे चौकशी केल्या भारती पवार यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते.
संबंधित बातम्या: