युवासेनेच्या नाराजीनंतर पूनम महाजन बिथरल्या, थेट ‘मातोश्री’च्या दारावर
मुंबई : प्रचाराच्या बॅनरवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो न छापल्याने भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना युवासेनेच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात युवासेनेचा राग ओढवून घेणं महागात पडू शकतं, म्हणून बिथरलेल्या पूनम महाजन या थेट ‘मातोश्री’चे दार ठोठावणार आहेत. आज दुपारी 12 वाजता पूनम महाजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची […]
मुंबई : प्रचाराच्या बॅनरवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो न छापल्याने भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांना युवासेनेच्या रोषाचा सामना करावा लागला आहे. ऐन निवडणुकीच्या काळात युवासेनेचा राग ओढवून घेणं महागात पडू शकतं, म्हणून बिथरलेल्या पूनम महाजन या थेट ‘मातोश्री’चे दार ठोठावणार आहेत. आज दुपारी 12 वाजता पूनम महाजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
भाजप खासदार पूनम महाजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज दुपारी 12वाजता मातोश्रीवर जाणार आहेत. उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात पूनम महाजन यांनी महायुतीच्या नेत्यांचे जे बॅनर लावले होते, त्यात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो लावला नव्हता. त्यामुळे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी काल वांद्रे येथील शिवसेना शाखेत पूनम महाजन यांचा निषेध करणारी बैठक घेतली होती. त्यामुळे धास्तावलेल्या पूनम महाजन आज मातोश्रीवर जात असल्याची माहिती आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
मुंबईतील उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार पूनम महाजन यांनी महायुतीच्या नेत्यांचं बॅनर लावलं होत. त्यावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा फोटो छापला नव्हता. त्यामुळे युवासेनेने नाराजी व्यक्त केली.
“आदित्य ठाकरे हे युथ आयकॉन आहेत, युवकांचे आशास्थान आहेत, त्यांचा अपमान हा आम्हा शिवसैनिकांचा अपमान आहे. उत्तर-मध्य लोकसभेच्या उमेदवार पूनम महाजन यांनी बॅनरवर आदित्य ठाकरे यांना डावललं आहे. या प्रकाराचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो.” असे युवासेनेने म्हटले.
जोपर्यंत पूनम महाजन आपली चूक मान्य करत नाही, तोपर्यंत भाजपच्या प्रचारावर बहिष्कार टाकण्याचीही भूमिका युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली. त्यामुळे भाजपच्या उत्तर-मध्ये मुंबईच्या उमेदवार पूनम महाजन यांचे धाबे दणाणले. त्यानंतर त्यांनी आज अखेर थेट ‘मातोश्री’चे दरवाजे ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.