शाळेत मिळणार अंडी, शिवसेना मंत्र्याचा निर्णयास भाजपचा विरोध
deepak kesarkar | शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात भारतीय जनता पक्षाने मोहीम उघडली आहे. दीपक केसरकर यांनी घेतलेल्या निर्णयास विरोध केला आहे. दीपक केसरकर यांनी शाळेत विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारात अंडी देण्याचा निर्णय घेतला आहे.
भूषण पाटील, कोल्हापूर, दि. 6 जानेवारी 2024 | शालेय शिक्षण विभागाने मध्यान भोजनात विद्यार्थ्यांना अंडी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. भाजप जैन सेलकडून शाळेत अंडे देण्याच्या निर्णयास तीव्र विरोध करण्यात आला आहे. दीपक केसरकर यांच्या या निर्णयास विरोध म्हणून भाजप जैन सेलकडून त्यांना कडधान्याची पाकीट पाठवली आहेत. कोल्हापूर येथील पोस्ट ऑफिसमधून मंत्री केसरकर यांना कडधान्याची पाकीट पाठवली आहे. मध्यान भोजनात विद्यार्थ्यांना अंड वितरित करण्याचा निर्णय तत्काळ रद्द करण्याची मागणी भाजपा जैन सेल प्रदेशाध्यक्ष संदीप भंडारी यांनी केली आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास राज्यभरातून दीपक केसरकर यांना मोठ्या संख्येने कडधान्याची पाकीटे पाठवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भाजप आध्यात्मिक आघाडीचा विरोध
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरड धान्यावरती विशेष भर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाला मंत्री दीपक केसरकर यांनी खो घातला आहे. भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी शाळेत अंडे देण्याचा निर्णयास विरोध दर्शवला आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात विद्यार्थ्यांना अंडी देण्याचा निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक क्षेत्रातील अनेक जणांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे आपण हा निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी मागणी भोसले यांनी केली आहे.
कोणत्या विद्यार्थ्यांना अंडी
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत असणाऱ्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार दिला जातो. यासाठी स्थानिक बाजारातून संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना अंडी आणि फळे घेता येणार आहेत. त्यासाठी पहिल्या सहा आठवड्यांच्या खर्चापोटी प्रत्येक विद्यार्थ्याला ३० रुपये दिला जाणार आहेत. परंतु शालेय पोषण आहारात अंडी देऊ नये, अशी मागणी भाजपने केली आहे.