शेवटच्या मंत्रिमंडळ विस्तारावर एकनाथ खडसेंची नाराजीयुक्त बाणेदार प्रतिक्रिया
"जेव्हा पक्ष कुठेच नव्हता, तेव्हापासून मी काम करत आहे, आणि आज पक्ष कुठच्या कुठं पोहचला आहे"
मुंबई : काही महिन्यांचं मंत्रिपद मिळावं, यात मलाच रस नाही. कारण येत्या काही महिन्यात आचारसंहिता लागू होतील, त्यामुळे काही खास करता येणार नाही, असे म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी नाराजीयुक्त बाणेदार प्रतिक्रिया दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार आज पार पडला. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षपणे आपली नाराजीही व्यक्त केली.
“पक्षाने (भाजप) मला क्लीन चिट दिली आहे. बघू समोर काय जबाबदारी मिळते. जी मिळेल ते करु”, असे म्हणत एकनाथ खडसे पुढे म्हणाले, “मी एकटाच असा मंत्री होतो, ज्याच्यावर आरोप लागताच राजीनामा दिला. बाकीच्यावर आरोप लागले, पण काही झालं नाही.”
जेव्हा पक्ष कुठेच नव्हता, तेव्हापासून मी काम करत आहे, आणि आज पक्ष कुठच्या कुठं पोहचला आहे, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी अप्रत्यक्षपणे आपल्या मनातील खंत व्यक्त केली.
पुढल्या वेळीही मुख्यमंत्री भाजपचाच असेल, यावर विश्वास आहे, असा विश्वास यावेळी एकनाथ खडसेंनी व्यक्त केला. तसेच, सत्तेसाठी मी काम केलं नाही, पक्षासाठी काम केलं आणि पुढही करु, असेही खडसेंनी नमूद केले.
राज्य मंत्रिमंडळाचा शेवटचा विस्तार
राज्य मंत्रिडळाचा विस्तार पार पडला असून, एकूण 13 नव्या मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात 8 कॅबिनेट मंत्री आणि 5 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. महायुतीतील भाजपच्या कोट्यातून 10, शिवसेनेतून 2 आणि रिपाइं-आठवले गटातून एका नव्या मंत्र्याचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे.
काँग्रेसमधून नुकतेच भाजपावासी झालेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे, तर राष्ट्रवादीतून महिन्याभरापूर्वी शिवसेनेत दाखल झालेल्या जयदत्त क्षीरसागर यांनाही कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आहे.
दुसरीकडे, राजकुमार बडोले, प्रकाश मेहता, विष्णू सावरा, दिलीप कांबळे, प्रवीण पोटे, अंबरिश अत्राम यांनी आपापल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या सहाही मंत्र्यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांचे राजीनामे स्वीकारले आहेत.