Chandrashekhar Bawankule | पवारांनी अनेकदा महाराष्ट्र पिंजून काढला, 60 च्या पुढे गेले नाहीत, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळेंचा निशाणा
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या महाराष्ट्र दौऱ्याविषयी चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, ' यापूर्वी शरद पवारांनी खूप वेळा महाराष्ट्र पिंजून काढलाय, पण कधी 60 च्या वर गेले नाहीयेत.
मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी याआधीची अनेकदा महाराष्ट्र पिंजून काढलाय. पण 60 च्या पुढे ते गेले नाहीत, अशी बोचरी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे (Chandrashekhar Bawannkule) यांनी केली आहे. शरद पवार यांनी नुकताच राज्यभर दौरा सुरु केला. याची सुरुवातच त्यांनी एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातून केली. उद्धव ठाकरेदेखील (Uddhav Thackeray) ठाण्यातूनच दौऱ्याची सुरुवात करणार असल्याचं म्हटलं जातंय. यावर बोलताना चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी ही बोचरी टीका केली. बावन्नकुळे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मनसेची युती होण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. आधी विनोद तावडे, नंतर देवेंद्र फडणवीस तसेच आज चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. बावन्नकुळे यांनी या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. युतीचा निर्णय वरिष्ठ घेतील, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
‘बाळासाहेबांच्या विचारांना बगल…’
उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड युतीची घोषणा केली. यावर टीका करताना चंद्रशेखर बावन्नकुळे म्हणाले, ‘ संभाजी ब्रिगेड जे हिंदुत्वाच्या कट्टर विरोधी पक्षाशी शिवसेना युती करतेय. आणि दुसरीकडे हिंदुत्वाची भाषा शिवसेना करतेय. त्यामुळे शिवसेना सध्या गडबडलेल्या भूमिकेत आहे. मात्र त्यांचं हिंदुत्व खरंच बेगडी आहे. जे शरद पवार आणि काँग्रेससोबत बसतात. नंतर आम्हाला हिंदुत्वाच्या गोष्टी शिकवतात. मतदानाच्या वेळी जनता ठरवेल. खरं-खोटं. उद्धवजी आता खरोखर हिंदुत्ववादी राहिले नाहीयेत. पारिवरीक प्रेमात ते सगळं विसरले आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या जीवन चरित्राला बगल देत ते आपलं कर्तृत्व करत आहेत….’
अमित शहांच्या मुंबई दौऱ्यात काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गणेशोत्सवात मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या अनुशंगाने हा दौरा महत्त्वाचा मानला जातोय. मात्र चंद्रशेखऱ बावन्नकुळे म्हणाले, ‘ अमित शहा मुंबईत येणार आहेत. ते नेहमीच लालबागच्या गणपीच्या दर्शनासाठी येत असतात. मधल्या कोरोनाच्या काळात खंड पडला असेल. पण यंदा त्यासाठीच ते येत आहेत.
अडीच वर्षा का फिरला नाहीत?
उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या महाराष्ट्र दौऱ्याविषयी चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, ‘ यापूर्वी शरद पवारांनी खूप वेळा महाराष्ट्र पिंजून काढलाय, पण कधी 60 च्या वर गेले नाहीयेत. आतापर्यंत त्यांचं राजकारण पाहिलं असता, जेव्हा जेव्हा सत्तेत आले, तेव्हा कुणाला तरी तोडूनच आले. अडीच वर्ष कोरोना संकटात फिरायची संधी होती. तेव्हा फिरू शकले असते. पण आता ते फिरतायत. पक्ष वाढवायला त्यांना मनाई नाही. पण अडीच वर्ष कुठे गेले होते, हे जनता विचारणार आहे..