Sanjay Raut : एकनाथ शिंदेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुंबई तोडण्याचा डाव; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : शिंदे समर्थकांकडून पोस्टरवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो लावला जात आहे. त्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काल उद्धव ठाकरेंनी सांगितलं हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही.
मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर मुंबई तोडण्याचा आरोप केला आहे. भाजपला (bjp) मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची आहे. मुंबईची ताकद कमी करायची आहे. त्यासाठी तुम्ही तुमच्या खांद्यावर त्यांना बंदूक ठेवू दिली आहे. त्यांनी स्पष्टपणे राज्यातील जनतेला सांगायला हवं की मुंबईवर शिवसेनेचाच (Shivsena) भगवा राहील. पण नाही. त्यांना शिवसेनेचा पराभव घडून आणण्यासाठीच मुख्यमंत्री केलं आणि मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे. हे हळूहळू स्पष्ट होईल, असा आरोप संजय राऊत (sanjay raut) यांनी केला. संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. सध्या महाराष्ट्रात नवीन राज्य आलं आहे. नवीन विटी नवीन दांडू… त्यांनी त्याचं काम करावं, असंही राऊत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं आहे.
शिंदे समर्थकांकडून पोस्टरवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा फोटो लावला जात आहे. त्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. काल उद्धव ठाकरेंनी सांगितलं हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. हे एकदा स्पष्ट झाल्यावर असं कोणी करत असेल तर हे त्यांच्या मनात त्यांनी जो गुन्हा केला त्याची खदखद आहे. आपण चुकलोय, आपण गुन्हा केलाय, आपण आपल्या नेत्याला फसवलं. आपण आपल्या शिवसैनिकाला फसवलंय, अशी भावना निर्माण होत असेल. त्यातूनच हे सगळं सुरू आहे. लोकांना भ्रमिष्ट केलं जात आहे. ही भाजपची स्ट्रॅटेजी आहे. त्याच पद्धतीने शिवसेनेतून पडलेले लोक तसे करत आहेत. शेवटी या राज्यातील जनता आणि शिवसैनिक दुधखुळे नाहीयेत, असं राऊत म्हणाले.
उपमुख्यमंत्री लावणं जड जातंय
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाच्या पोस्टरवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो गायब आहे. त्याकडे त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. यावर मी काय बोलणार. माझ्या तोंडात अजून उपमुख्यमंत्री हा शब्द बसला नाहीये. माजी मुख्यमंत्री किंवा भावी मुख्यमंत्री आपण सतत आपण त्यांना बोलत राहिलो. पण उप हा शब्द त्यांच्या मागे लावायला मला जड जात आहे. तरीही देवेंद्रजींच्या संदर्भात असं काही होत असेल तर त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, असं ते म्हणाले.
राऊतांचा फडणवीसांना टोला
ते मुख्यमंत्रीपदाच्या तयारीत होते. पक्षाच्या बैठकीत त्यांचं नाव जवळपास फिक्स झालं होते. पण त्यांना दुसऱ्या क्रमांकाचे पद स्वीकारा असं सांगितलं जातं. जे आता मुख्यमंत्री झाले ते फडणवीसांच्या मंत्रिमंडळात ज्युनिअर मंत्री होते. पण भाजपमध्ये शिस्त आणि आदेशाचं पालन केलं जातं. त्यानुसार ते वागले. त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यासाठी, असा चिमटाही त्यांनी काढला.