राणे-सेना वादानंतर भाजपची गांधीगिरी, अमृतमहोत्सवी वर्ष मुख्यमंत्र्यांच्या लक्षात राहण्यासाठी 75 हजार पत्र पाठवणार
देशाच्या स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष मुख्यमंत्र्यांच्या लक्षात राहण्यासाठी भाजप 75 हजार पत्र पाठवणार आहे. कालपासून अमरावती शहरातून या अभियानाची सुरुवातही झाली आहे.
मुंबई : देशाचा यंदाचा स्वातंत्र्यदिन हिरक की अमृतमहोत्सव यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून गोंधळ झाला. त्यानंतर आता देशाच्या स्वातंत्र्याचं अमृतमहोत्सवी वर्ष मुख्यमंत्र्यांच्या लक्षात राहण्यासाठी भाजप 75 हजार पत्र पाठवणार आहे. कालपासून अमरावती शहरातून या अभियानाची सुरुवातही झाली आहे.
देश कितवा स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय याची आठवण मुख्यमंत्र्यांना नसल्याचा आरोप भाजपने याआधी केला. आता त्यानंतर भाजप पत्र लिहून ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचं मुख्यमंत्र्यांना स्मरण करुण देणार आहे. भारतीय जनता युवा मोर्चा उद्धव ठाकरे यांना 75 हजार पत्र लिहिणार आहे.
राणे-सेना वादानंतर भाजपची गांधीगिरी
मुख्यमंत्र्यांच्या याच गोंधळावर बोट ठेवत केंद्रीय मंत्री नारायण राणे आक्षेपार्ह वक्तव्य करुन गेले. त्यांनंतर त्यांनी केलेल्या वक्तव्याची त्यांना किंमत चुकवावी लागली. मंगळवारी त्यांना अटक झाली आणि काही तासानंतर न्यायालयाच्या जामीनानंतर त्यांची सुटका झाली. नारायण राणे आणि शिवसेना वादानंतर भाजप आता गांधीगिरीची पर्याय स्वीकारणार आहे.
युवा मोर्चाचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना लिहिणार 75 हजार पत्र
राज्यभरातून युवा मोर्चाचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांना 75 हजार स्मरणपत्र पाठवणार आहे, अशी माहिती भारतीय जनता युवा मोर्चाचे राज्य प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. तसंच युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत बाळासाहेब पाटील यांनीही ट्विट करुन भाजपच्या गांधीगिरी अभियानाविषयी माहिती दिली आहे.
देशाचे अमृत महोत्सवी वर्ष तरी मुख्यमंत्र्यांच्या लक्षात राहवे यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा मुख्यमंत्र्यांना 75000 पत्र पाठवणार आहे.याची सुरुवात अमरावती शहर येथे आज करण्यात आली.@Dev_Fadnavis @ChDadaPatil @cbawankule @mipravindarekar @ShelarAshish @abpmajhatv @TV9Marathi pic.twitter.com/WIYQHea8lO
— Vikrant Balasaheb Patil (@ivikrantpatil) August 26, 2021
स्वातंत्र्यदिनी नेमका काय प्रकार झाला?
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हिरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
(BJP Youth Morcha Written 75 thousand letter To Cm Uddhav thackeray)
हे ही वाचा :