नव्या मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना संधी, भाजपच्या तीन महिला आमदारांची नावे चर्चेत; वर्षभरानंतर बॅकलॉग भरणार
येत्या 10 दिवसात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारात महिलांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मंत्रिपदासाठी भाजपमधून तीन महिलांच्या नावांची चर्चाही सुरू आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गेल्याच आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन आले. या तिन्ही नेत्यांमध्ये सुमारे तीन ते चार तास चर्चा झाली. त्यानंतर मध्यरात्री शिंदे आणि फडणवीस हे मुंबईत आले. तेव्हापासून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला वेग आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्याचंही सांगण्यात येत आहे. दोन दिवसापूर्वी तर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी येत्या आठ दिवसात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगून टाकल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार कधीही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्यातील शिंदे सरकारला एक वर्ष पूर्ण झालं आहे. पण या मंत्रिमंडळात एकाही महिलेला संधी देण्यात आलेली नसल्याने या सरकारवर टीका करण्यात येत होती. विरोधकांनी या मुद्द्यावरून शिंदे सरकारला चांगलंच फैलावर घेतलं होतं. त्यानंतर आता नव्या विस्तारात महिलांचा समावेश केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि माधुरी मिसाळ या तीन महिला आमदारांपैकी एक किंवा दोनजणींचा नव्या विस्तारात समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातही देवयानी फरांदे या मंत्री होण्याची शक्यता अधिक आहे. फरांदे या ज्येष्ठ आमदार आहेत. शिवाय नाशिकमध्ये महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर देवयांनी फरांदे यांना मंत्रीपदाची लॉटरी लागण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.
कोअर कमिटीत निर्णय होणार
दरम्यान, आज भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या विस्तारात कुणाकुणाचा समावेश करायचा यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. भाजपकडून यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता अधिक आहे. गोपीनाथ पडळकर यांची मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमदार रवी राणा यांना संधी मिळते की नाही याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रासप नेते महादेव जानकर आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचाही समावेश होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
फक्त पाच मंत्र्यांचा समावेश
मागील अनेक महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सुरू असलेल्या तर्कवितर्कांना तूर्तास पूर्णविराम मिळावा यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सक्रिय झाले आहेत. येत्या 10 दिवसांत शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षातील काही आमदारांना वर्षावर बोलावल्याची माहिती आहे. या आमदारांसोबत मुख्यमंत्री स्वत: चर्चा करणार आहेत.
नवीन मंत्रिमंडळामध्ये शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येकी पाच नेत्यांची मंत्रीपदावर वर्णी लागणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. शिंदे गटाकडून बच्चू कडू याांना संधी दिली जाणार असल्याचंही बोललं जात आहे. मात्र, विस्तारात प्रत्येक गटाच्या फक्त पाचच जणांना संधी मिळणार असल्याने शिंदे गटात धुसफूस वाढण्याची शक्यता अधिक आहे.
तिथे मुंडक्याला महत्त्व
मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतो. आमच्या मागे एकही आमदार नाही. खासदारही नाही. सरकारमध्ये तिथे मुंडक्याला महत्त्व आहे. ते आमच्या पाठीमागे नाही. त्यामुळे आम्ही कशाला म्हणावं आम्हाला घेता का? त्यांनी कुणालाबी घ्यावं फक्त शेतकऱ्यांची कामे करावी, असं सदाभाऊ खोत म्हणाले.