पहिली लढाई जिंकली, आता ‘त्या’ खंबीरपणे लढणार; अखेर ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर
ऋतुजा लटके यांनीही निवडणुकीत उतरण्यासाठी महापालिकेतील नोकरीचा राजीनामा दिला. मात्र, महापालिकेने हा राजीनामा मंजूर केला नाही. त्यामुळे हे प्रकरण कोर्टात गेलं.
मुंबई: पतीच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर उभं राहण्याचा पक्षाने आग्रह धरला. त्यामुळे तिनेही विधानसभा निवडणुकीत (election) उभं राहायचं ठरवलं. आपल्या पक्षाची गेलेली पत परत मिळवायची म्हणून आधी तिने महापालिकेतील (bmc) लिपिकपदाचा राजीनामा दिला. पण तिचा राजीनामा स्वीकारला गेला नाही. मग तिने एक महिन्याचा पगार भरून राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली. तरीही तिचा राजीनामा फेटाळला गेला. तुमचा राजीनामा फेटाळला जातोय हे त्यांना एक महिन्यानंतर सांगितलं गेलं. निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असताना अचानक काळजात धस्स करणारं पालिकेचं कारण ऐकलं. तरीही ती खचली नाही. तिने कोर्टात धाव घेतली अन् कोर्टाने तिच्या बाजूने निर्णय दिला. आज अखेर तिचा राजीनामा महापालिकेने मंजूर केला अन् तिला आकाश ठेंगणं झालंय. पहिली लढाई जिंकली. आता ती खंबीरपणे लढणार… ही गोष्ट आहे ऋतुजा लटके यांची. ऋतुजा लटके (rutuja latke) यांनी निवडणुकीच्या मैदानात पाऊल टाकल्याने आता अंधेरीची निवडणूक अधिकच चुरशीची ठरणार आहे हे मात्र निश्चित.
उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्वीकारला आहे. त्यांना राजीनामा स्वीकारल्याचं पत्रं देण्यात आलं आहे. हे पत्र घेण्यासाठी ऋतुजा लटके स्वत: महापालिकेत आल्या होत्या. हे पत्र घेऊन आता दुपारी त्या निवडणुकीचा अर्ज भरणार आहेत. राजीनामा स्वीकारल्याचं पत्रं मिळाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. एक लढाई जिंकल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होतं.
महापालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा आज मंजूर केला असला तरी राजीनामा स्वीकारल्याच्या पत्रावर 13 ऑक्टोबर रोजी राजीनामा स्वीकारल्याची तारीख नमूद करण्यात आली आहे. म्हणजे कोर्टाच्या निर्णयानंतर महापालिकेने तात्काळ लटके यांचा राजीनामा मंजूर केल्याचं स्पष्ट दिसत आहे.
रमेश लटके यांचं निधन झाल्याने अंधेरी पूर्व विधानसभेची जागा रिक्त झाली होती. निवडणूक आयोगाने या जागेवरील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली.
ऋतुजा लटके यांनीही निवडणुकीत उतरण्यासाठी महापालिकेतील नोकरीचा राजीनामा दिला. मात्र, महापालिकेने हा राजीनामा मंजूर केला नाही. त्यामुळे हे प्रकरण कोर्टात गेलं. कोर्टाने महापालिकेवर ताशेरे ओढले. एखादा कर्मचारी निवडणूक लढत असेल तर राजीनामा स्वीकारण्यात अडचण काय? असा सवाल कोर्टाने केला.
तसेच उद्या सकाळी म्हणजे 14 ऑक्टोबरच्या सकाळी 11 वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करा, असे आदेशच कोर्टाने महापालिकेला दिले. त्यानुसार लटके यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर केला आहे.