किसमे कितना है दम! अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर; शिंदे गट लढणार की भाजपा?
या पोटनिवडणुकीत निवडणूक आयोग धनुष्यबाणाचं चिन्हं कुणाला देणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे गटाने निवडणूक लढवल्यास हे चिन्हं शिंदे गटाला मिळणार की शिवसेनेला याचीही उत्सुकता लागली आहे.
संदीप राजगोळकर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: शिवसेना आमदार रमेश लटके (ramesh latke) यांच्या निधानामुळे रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. या निवडणुकीत शिवसेनेकडून (shivsena) लटके यांच्या पत्नीला तिकीट दिलं जाणार आहे. तर ही निवडणूक शिंदे गट लढणार की भाजप (bjp) लढणार याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. शिंदे गटाने ही निवडणूक लढल्यास खरी शिवसेना कुणाची? हे सुद्धा या निवडणुकीतून अधोरेखित होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या 3 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. 14 ऑक्टोबरही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. 15 ऑक्टोबर रोजी अर्ज छाननी होणार आहे. तर 17 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे.
शिवसेनेकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतूजा लटके यांना उमेदवारी दिली जाणार आहे. मात्र, त्यांच्या विरोधात कोण लढणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. ही पोटनिवडणूक शिंदे गट लढणार की भाजप लढणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
शिंदे गटाकडून वारंवार आपणच ओरिजिनिल शिवसेना असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे शिवसेना म्हणून शिंदे गट या जागेवर दावा करून ती लढवणार की भाजप शिंदे गटाकडून ही जागा हिसकावून घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिंदे गटाने ही निवडणूक लढवल्यास उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असं या निवडणुकीचं चित्रं होणार आहे. त्यामुळे मुंबईत कुणाची ताकद असेल हे सुद्धा दिसून येणार आहे. या शिवाय मुंबईत मतदार कुणाच्या पाठी आहेत हे दिसून येणार असून त्याचा थेट परिणाम मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर होणार असल्याचंही सांगितलं जात आहे.
शिवसेनेतील फुटीनंतरची ही पहिलीच मोठी निवडणूक असणार आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची आणि प्रतिष्ठेची होणार असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागलं आहे.
या पोटनिवडणुकीत निवडणूक आयोग धनुष्यबाणाचं चिन्हं कुणाला देणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिंदे गटाने निवडणूक लढवल्यास हे चिन्हं शिंदे गटाला मिळणार की शिवसेनेला याचीही उत्सुकता लागली आहे.
भाजपनेही ही निवडणूक लढल्यास धनुष्यबाणाचं चिन्हं निवडणूक आयोग शिवसेनेला देणार का? सध्या निवडणूक आयोगाकडे चिन्हाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे हे चिन्हं कुणाला मिळणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.