त्या लिपस्टिकवालीला काय कळतं?, चंद्रकांत खैरे यांची जीभ घसरली; कुणावर साधला निशाणा?
आमदार बोरणारे यांनी सख्या भावजयला मारहाण केली. हे कसले आमदार? काही दिवसांनी हे बोरणारे आमदार जेलमध्ये जाणार, असा दावाही त्यांनी केला.
औरंगाबाद: ठाकरे गटाचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्यावर निशाणा साधला आहे. ही टीका करताना चंद्रकांत खैरे यांची जीभ घसरली. त्यांनी भाषणाच्या ओघात दिपाली सय्यद यांचा उल्लेख लिपस्टिकवाली बाई असा उल्लेख केला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. महाप्रबोधन यात्रेला संबोधित करताना त्यांनी हा उल्लेख केला.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखाली महाप्रबोधन यात्रा सुरू आहे. सध्या औरंगाबादेत ही यात्रा आहे. शिंदे गटाचे आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या विधानसभा मतदार संघात काल सुषमा अंधारे यांची सभा झाली. यावेळी चंद्रकात खैरे, मनिषा कायंदे, विनोद घोसाळकर आदी ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते.
दिपाली सय्यद यांनी सुषमा अंधारे आणि नीलम गोऱ्हे या चिल्लर नेत्या असल्याचं म्हटलं होतं. हाच धागा पकडून चंद्रकांत खैरे यांनी सय्यद यांच्यावर निशाणा साधला. एका लिपस्टिकवाल्या बाईने सांगितलं. सुषमा अंधारे आणि नीलम गोऱ्हेंकडे काहीच नाही. त्या मीडियाशी बोलल्या, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.
सुषमा अंधारे यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण झालेलं आहे. दसरा मेळाव्याला मी त्यांना सांगितलं तुमचं अप्रतिम भाषण झालं. त्यावेळी त्या म्हणाल्या, साहेब, तुम्ही शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस साजरा करत होते. तुम्ही एकांकीका स्पर्धा भरवल्या होत्या. तेव्हा माझ्याकडे कॉलेजची फी भरायला पैसेही नव्हते. तेव्हा मी प्रचंड अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. मी दोन्ही स्पर्धेत भाग घेतला आणि दहा हजार रुपये पारितोषिक मिळवले… अशा या ताई आहेत. त्या लिपस्टिकवालीला काय समजतं? घेऊन फिरतील तिला. आता तिला पक्षात घेतही नाहीत ते, असा टोला त्यांनी लगावला.
सुषमाताई असो, मनिषा कायंदे ताई असो की नीलमताई गोऱ्हे असो, या मान्यवर महिला खूप मोठ्या आहेत. आमच्याकडे अशा मान्यवर महिला आहेत. तू काही बोलू नकोस म्हटलं. पावडर लावून आमच्याकडे येऊ नको. स्वत: मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या. शिवसेना नेत्या. कसल्या नेत्या? बोलण्याचा अधिकार फक्त शिवसेना नेते आणि प्रवक्त्यांना अधिकार असतो, असंही त्यांनी सांगितलं.
सुषमा अंधारे या महाप्रबोधन यात्रेच्या जनक आहेत. मी त्यांच्या आधी बोलतो. त्यांना शेवटी बोलायला सांगितलं. कारण त्या 40 आमदारांना साफ करणार आहेत, असं ते म्हणाले.
आमदार बोरणारे यांनी सख्या भावजयला मारहाण केली. हे कसले आमदार? काही दिवसांनी हे बोरणारे आमदार जेलमध्ये जाणार, असा दावाही त्यांनी केला. खैरे यांचं भाषण सुरू असतानाच पब्लिकमधून सुषमा ताईला बोलू द्या, अशी जोरदार मागणी करण्यात आली. त्यामुळे अखेर खैरे यांनी भाषण आवरते घेतले आणि सुषमा अंधारे बोलतील असे सांगितले.