जर मुंबईत सेनेची ताकद तर महापालिकेची निवडणूक लढवा, राज ठाकरेंच्या अंगणातून चंद्रकांतदादांचं राऊतांना चॅलेंज
जर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर संजय राऊत यांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेफ जागेवरुन निवडणूक लढवून दाखवावी, असं चॅलेंज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राऊतांना दिलं.
मुंबई : जर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेफ जागेवरुन निवडणूक लढवून दाखवावी, असं चॅलेंज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राऊतांना दिलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना त्यांनी राऊतांची खिल्ली उडवत महापालिकेची निवडणूक लढवा, असं चॅलेंज राजसाहेबांच्या अंगणातूनच दिलं.
चंद्रकांतदादांचं संजय राऊतांना आव्हान
राज ठाकरे-चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर संजय राऊत यांनी काहीशी खोचक टिप्पणी केली होती. पत्रकारांनी याच मुद्द्यावर चंद्रकांतदादांना छेडलं. त्यावर चेहऱ्यावर काहीसा राग दाखवत दादांनी राऊतांना थेट निवडणूक लढविण्याचं आव्हान दिलं.
संजय राऊतांनी निवडणुकीत उतरुन आपले दंडही चेक करावेत आणि क्षमताही
“जर मुंबईत शिवसेनेची ताकद असेल तर संजय राऊत यांनी येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत सेफ जागेवरुन निवडणूक लढवून दाखवावी. मराठीमध्ये एक म्हण आहे, दंड थोपटले…. संजय राऊतांनी निवडणुकीत उतरुन आपले दंडही चेक करावेत आणि क्षमताही पाहावी”, असा हल्लाबोल चंद्रकांतदादांनी राऊतांवर केला.
भाजप आणि मनसेने एकत्र येऊन लढून दाखवावं, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी राज ठाकरे-चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर बोलताना दिली होती. राऊतांची हीच प्रतिक्रिया चंद्रकांतदादांना झोंबली. त्यांनी राऊतांवर थेट हल्ला चढवत आपले दंड तपासण्याचा सल्ला दिला.
चंद्रकांत पाटील-राज ठाकरेंची भेट
तत्पूर्वी चंद्रकांत पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी म्हणजेच ‘कृष्णकुंज’वर ही भेट झाली. उभय नेत्यांमध्ये जवळपास 40 ते 45 मिनिटे चर्चा झाली. संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता लागून राहिली होती की या दोन बड्या नेत्यांमध्ये कोणत्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली? राज ठाकरेंना भेटून आल्यानंतर त्यांच्या निवासस्थानाबाहेरुनच चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा तपशील सांगितला.
युतीची चर्चा नाही तर एकमेकांच्या भूमिकेांविषयी चर्चा
“आजच्या बैठकीत युतीची कोणतीही चर्चा झाली नाही. राजकीय चर्चा झाली असं म्हणता येईल, पण युतीची चर्चा नाही तर एकमेकांच्या भूमिकेांविषयी चर्चा झाली. कारण त्यांच्या परप्रातीयांद्दलच्या काही भूमिका मला समजून घ्यायच्या होत्या. कुठल्याही माणसाच्या दोन भूमिका असतात, एक माणूस म्हणून आणि कार्यकर्ता म्हणून, नेता म्हणून.. माणूस म्हणून मला त्यांच्या भूमिकांवर चर्चा करायची होती. त्यासाठी आजची भेट झाली”, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
मनसे- भाजप एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही
मी विद्यार्थी परिषदेत होतो. तेव्हा राज ठाकरे BVS चे काम करायचं. तेव्हापासून माझ्या मनात यांच्याबद्दल आकर्षण होतं, व्यक्ती म्हणून एकमेकांचं सुख पाहणं, यश पाहणं हे आहेच.. राज ठाकरेंना भूमिका बदला, तुम्ही महाराष्ट्राचे नेते व्हायला हवे हे मी माणूस म्हणून सांगणं वेगळं.. सध्या मनसे आणि भाजप एकत्र येऊन निवडणुका लढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते, नाशिकला ते ही जातात मी ही जातो, आम्ही अचानक भेटलो. मी गेले वर्षभर बोलतोय त्यांनी त्यांची भूमिका बदलावी.. नाशिकमध्ये समोरासमोर भेटलो, आज चर्चा झाली.
(Chandrakant Patil Challenge To Sanjay Raut After Raj thackeray Meeting)
हे ही वाचा :
राजकीय चर्चा नक्कीच झाली, पण युतीची चर्चा नाही; चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
राज ठाकरेंसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?, चंद्रकांत पाटील यांनी डिटेल सांगितलं!