गोवा, उत्तर प्रदेश निवडणुकीबाबत पवार, राऊतांचं मोठं भाकित, चंद्रकांतदादा म्हणतात ‘मुख्यमंत्री कधी बाहेर पडणार ते सांगा’!
शरद पवार यांनी उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूरची निवडणूक राष्ट्रवादी लढवणार असल्याची घोषणा केलीय. तसंच उत्तर प्रदेश आणि गोव्यात परिवर्तन होईल असं भाकित केलंय. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार असल्याचा दावा केलाय. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार आणि राऊतांवर जोरदार पलटवार केलाय.
मुंबई : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या (5 State Assembly Election) घोषणेनंतर आता निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूरची निवडणूक राष्ट्रवादी लढवणार असल्याची घोषणा केलीय. तसंच उत्तर प्रदेश आणि गोव्यात परिवर्तन होईल असं भाकित केलंय. तर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार असल्याचा दावा केलाय. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवार आणि राऊतांवर जोरदार पलटवार केलाय.
‘ज्योतिष्य, कर्मकांड नाकारणारे शरद पवार आणि प्रबोधनकारांचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत भविष्यवेत्ते कधी झाले? उत्तर प्रदेश, गोव्यात सत्ता परिवर्तनाबाबत दावे समजू शकतो, पण छातीठोक भविष्यवाणी हे मनोरंजन आहे. या दोन्ही महापुरुषांना खरोखरच ज्योतिष्य अवगत असेल, तर त्यांनी गोवा, उत्तर प्रदेशाबद्दल बोलण्यापेक्षा महाराष्ट्राबाबत भविष्य सांगावं. राऊत यांनी सांगावं की, शरद पवार पंतप्रधान कधी होतील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडतील, याची भविष्यवाणी पवारसाहेबांनी करावी’, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी ट्विटरद्वारे लगावलाय.
या दोन्ही महापुरुषांना खरोखरच ज्योतिष्य अवगत असेल, तर त्यांनी गोवा, उत्तर प्रदेशाबद्दल बोलण्यापेक्षा महाराष्ट्राबाबत भविष्य सांगावं. राऊत यांनी सांगावं की, शरद पवार पंतप्रधान कधी होतील आणि मुख्यमंत्री @OfficeofUT घराबाहेर कधी पडतील, याची भविष्यवाणी पवारसाहेबांनी करावी…
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 11, 2022
गोवा, उत्तर प्रदेशबाबत पवारांचं भाकित काय?
उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि इतर छोट्या – मोठ्या पक्षांची आघाडी झाली आहे. उद्या लखनऊमध्ये या सर्व पक्षांची बैठक होणार असून त्या बैठकीत जागा वाटपाची घोषणा करण्यात येईल असेही शरद पवार म्हणाले. उत्तर प्रदेशमध्ये लोकांना बदल हवा आहे त्यामुळे तिथे परिवर्तन होणार असल्याचं भाकित पवार यांनी केलंय.
योगींच्या वक्तव्याचा पवारांकडून समाचार
उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार आहे. उत्तर प्रगदेशात लोकांना बदल अपेक्षित आहे. तिथे जो एक सांप्रदायिक विचार मजबूत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. तिथल्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य मी ऐकलं की 80 टक्के लोक आमच्यासोबत आहेत. 20 टक्के फक्त आमच्यासोबत आहेत. अशाप्रकारचं वक्तव्य देशाच्या अल्पसंख्याक समुदाला ठेस पोहोचवणारं आहे. हे वक्तव्य एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याला शोभा देत नाही. देशात सेक्युलर विचार मजबूत करायचा असेल, एकतेला ताकद द्यायची असेल तर असा विचार, अशी भूमिका समाजहिताची नाही. त्यामुळे मला वाटतं की उत्तर प्रदेशातील जनता त्यांना धडा शिकवेल, असं मोठं वक्तव्य पवार यांनी केलंय.
संजय राऊतांचा भाजपला सावधगिरीचा इशारा
“गोव्यात भाजपाचे मंत्री आणि आमदाराने भाजपा सोडला म्हणजे गोव्यात भाजपा अभेद्य नाही. उत्तर प्रदेशात देखील अनेक आमदारांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. याचाच अर्थ हवामानाचा अंदाज काही लोकांना आलाय. मौर्य यांना हवेचा अंदाज पटकन येतो. त्यामुळे भाजपानं सावध राहावं”, असं विधान संजय राऊत यांनी केलं आहे.
इतर बातम्या :