सत्यजित तांबे यांना भाजपची खुली ऑफर, काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे
सत्यजित तांबे यांना भाजपने मदत केली आहे. त्यामुळे निकाल चांगले असतील अशी अपेक्षा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.
मुंबई : राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांचे मतदान पार पडले. पाच जागांपैकी सर्वाधिक चर्चा झाली नाशिक पदवीधर मतदार संघाच्या (Nashik MLC Election) निवडणुकीबाबत झाली. नाशिकमध्ये काँग्रेसमध्ये तांबे पितापुत्रावरून (Satyjeet Tambe) कलगीतुरा रंगाला. महाविकास आघाडीला ऐनवेळी आपला उमेदवार बदलावा लागला. शुभांगी पाटील (Shubhangi patil)महाविकास आघाडीच्या उमेदवार झाल्या तर सत्यजित तांबे भाजप अन् शिंदे गटाचे उमेदवार होते का? हे शेवटपर्यंत जाहीर झाले नाही. परंतु आतून मात्र तांबे यांनाच या दोन्ही पक्षांचा पाठिंबा होता.
नाशिक पदवीधर मतदारसंघात यंदा नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. या घडामोडी मतदानाच्या दिवसापर्यंत कायम होत्या. भाजपनं आपला सस्पेन्स कायम ठेवला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, नाशिकमध्ये भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबाचा निर्णय घ्यावा. त्यांनी जो निर्णय घेतला त्याला माझा ना नसेल, भाजपची मत विभाजित होणार नाही, हे निश्चित, असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडले होते. त्यामुळे जाहिररित्या नाहीतर तर आतून भाजपचा सत्यजित तांबे यांना पाठिंबा होता.
आता दिली ऑफर
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता सत्यजित तांबे यांना भाजपने मदत केल्याचे मंगळवारी सांगितले. त्यामुळे निकाल चांगले असतील अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच सत्यजित तांबे भाजपमध्ये आल्यास त्यांचे स्वागतच करु, असेही त्यांनी सांगितले. म्हणजेच आता नाशिक पदवीधर मतदार संघातून तांबे विजयी झाल्यास त्यांचा भाजप प्रवेश निश्चित असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
नाशिकमध्ये काय झाले होते
काँग्रेसचा एबी फॉर्म घेतलेले सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नाही. त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवार अर्ज दाखल केला. त्यावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले. सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरील राज्यातील राजकारण प्रचंड तापले होते. एकीकडे सत्यजित तांबे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला तर पाठिंब्याबाबत भाजपकडून जाहीररित्या काहीच सांगण्यात आले नाही.