परिवहन विभागाला एका मिनिटात एक हजार कोटी दिले; मग वीजबिल माफी का नाही?; बावनकुळेंचा सवाल
वीजबिल माफीच्या मुद्द्यावरू माजी ऊर्जा मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह राज्यातील ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं. (chandrashekhar bawankule on electricity bill issue)
नागपूर: वीजबिल माफीच्या मुद्द्यावरू माजी ऊर्जा मंत्री आणि भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह राज्यातील ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं. परिवनह विभागातील कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी एका मिनिटात एक हजार कोटी रुपये दिले जातात. मग वीजबिल माफीचा निर्णय का घेतला जात नाही?; असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. (chandrashekhar bawankule on electricity bill issue)
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणावर सडकून टीका केली. वीज बिलाच्या मुद्द्यावर हे सरकार खोटं बोलत आहे. सरकारने 100 युनिट वीज माफीचं आश्वासन दिलं होतं. दिलेलं आश्वासन या सरकारने पाळलं नाही. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवसाय ठप्प होते. तरीही सरासरी बिल दिलं. ऊर्जामंत्री नितीन राऊतही हतबल आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या फायली फेकून देत आहेत. सामाजिक चळवळीतून आलेल्या राऊत यांचं नाव खराब करण्याचं काम हे सरकार करत आहे. या सरकारमध्ये वाद आहे, असा दावा बावनकुळे यांनी केला.
वीजबिल माफीसाठी 5000 कोटी रुपये लागतील. पण सरकार पैसे देण्यास तयार नाही. अनिल परब यांच्या परिवहन खात्याला कामगारांच्या पगारासाठी एक हजार कोटींची गरज होती. त्यांना तात्काळ पैसे देण्यात आले. मग वीजबिल माफीचा निर्णय का घेतला जात नाही, असा सवालच त्यांनी केला.
पदवीधर धडा शिकवतील
आम्ही पाच वर्षात शेतकऱ्याचं एकही कनेक्शन कापलं नाही. उलट आम्ही विदर्भात सात लाख वीज कनेक्शन दिलं, असं सांगतानाच या सरकारने विदर्भाचा सत्यानाश करण्याचं काम सुरू केलं आहे. विदर्भावरील अन्याय सहन करू नका, असं आवाहन त्यांनी केलं. राज्यातील पदवीधर या सरकारला सोडणार नाहीत. पदवीधरांच्या निवडणुकीत सरकारला पराभवाचा सामना करावा लागेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
खुशाल चौकशी करा
या सरकारच्या काळात अनेक अवैध धंदे वाढले आहेत. रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी वाढली आहे. नागपूर, भंडारा आणि यवतमाळवरून रेट ठरवून दारूची तस्करी वाढली आहे. सरकारच्या काळातील या धंद्यावर प्रकाश टाकला तर बिघडले कुठे?, असं सांगतानाच सरकार तुमचंच आहे. माझी खुशाल चौकशी करा, असं आव्हानच बावनकुळे यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचं नाव न घेता दिलं.
बावनकुळे काय म्हणाले?
- मनसे अध्यक्ष राज ठाकरे वीजबिलाच्या मुद्द्यावर आंदोलन करणार आहेत. त्यांचं अभिनंदन. भाजप सुद्धा त्यांच्यासोबत या आंदोलनात राहील
- महावितरण वीज कनेक्शन तोडणीसाठी आलं तर भाजप आपला झेंडा घेवून तिथे हजर राहणार
- नितीन राऊत यांच्या पाठीशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाही, त्यामुळे अधिकारी त्यांना गांभीर्यानं घेत नाहीत
- आजच्या आज साडेतीन हजार कोटी रुपये ऊर्जा विभागाला दिले तर सर्व प्रश्न सुटतील
- १९५६ च्या नागपूर करारानुसार हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतलं नाही
- मुंबईत अधिवेशन होऊ शकतं नागपूरात होऊ शकत नाही?
- या अधिवेशनात मोठ्या संख्येनं मोर्चे येणार म्हणून अधिवेशन मुंबईत नेलं
- मुख्यमंत्री नागपूरला यायला घाबरतात, मग दिल्लीला काय जाणार?
- विदर्भ वैधानिक महामंडळ बंद पाडण्याचं काम या सरकारने केलंय
- मुख्यमंत्री, उपमुख्यनंत्र्यांची जबाबदारी काय?, ते कधी दिल्लीला गेलेत का? पंतप्रधानांना भेटले का?
- विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या आणि परवा नागपूरच्या दौऱ्यावर
महत्त्वाच्या घडामोडी LIVE https://t.co/7JdSEwiDvz
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 19, 2020
संबंधित बातम्या:
वीज बिल माफीच्या आश्वासनाचे काय झालं? प्रवीण दरेकरांचा ऊर्जामंत्र्यांना सवाल
(chandrashekhar bawankule on electricity bill issue)