माझ्या कुळाचा उद्धार करून उद्धव ठाकरे यांचे…; चंद्रशेखर बावनकुळेंचे जोरदार प्रत्युत्तर
काल गोरेगावच्या नेस्को संकुलात शिवसेने गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही सडकून टीका केली.
मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी काल गट नेत्यांच्या बैठकीत भाजपचे (bjp) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांच्यावर टीका करताना त्यांच्या कुळाचा उद्धार केला. उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा हा घाव बावनकुळे यांच्या चांगलाच वर्मी लागला आहे. या टीकेला बावनकुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करतानाच त्यांना सूचक इशाराही दिला आहे. माझ्या कुळाचा उद्धार करून उद्धव ठाकरे यांचे नैराश्य दूर होत असेल तर तो माझ्या कुळाचा सन्मानच आहे, असा टोलाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकापाठोपाठ एक चार ट्विट करून उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे हे वारंवार माझ्या कुळाचा कुत्सितपणे उल्लेख करतात. माझे वडील शेतकरी आहेत. आई- वडिलांनी मोठ्या कष्टातून मला घडविले. केवळ त्यांच्या कष्टाचा, संघर्षाचा वारसा मला मिळाला आहे. दुसरे काही नाही. गरीब शेतकऱ्याच्या पोटी जन्मास येणे गुन्हा आहे का?, असा सवाल करतानाच माझ्या कुळाचा उद्धार करून उद्धव ठाकरे यांचे नैराश्य दूर होत असेल तर तो माझ्या कुळाचा सन्मानच आहे, असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.
भाजपामुळे विधानसभा निवडणूक जिंकल्यावर मा. उद्धव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी विश्वासघात केलात. विश्वासघातामुळे तुम्हाला जनतेने वारंवार धडा शिकवलाय. ग्रामपंचायतीत काय झाले पाहा. उरलेला करेक्ट कार्यक्रम महापालिका निवडणुकीत करू.
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) September 21, 2022
भाजपामुळे विधानसभा निवडणूक जिंकल्यावर उद्धव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्रीपदासाठी विश्वासघात केलात. विश्वासघातामुळे तुम्हाला जनतेने वारंवार धडा शिकवलाय. ग्रामपंचायतीत काय झाले पाहा. उरलेला करेक्ट कार्यक्रम महापालिका निवडणुकीत करू. तयार राहा. अमितभाईंवर टीका करण्यापूर्वी उद्धवराव आधी स्वतःला सांभाळा. विश्वासघात करून तुमच्या कुळाला बट्टा लावलात ते आधी पाहा, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे.
काल गोरेगावच्या नेस्को संकुलात शिवसेने गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही सडकून टीका केली. भाजपमध्ये उपऱ्यांचा बाजार भरला आहे. त्यामुळे भाजपमध्ये ओरिजीनल कोण हेच कळत नाही. एवढे उपरे घेतले आहेत की तुमचा बावनकुळे की एकसे बावनकुळे हेच कळत नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.