उद्धव ठाकरे यांना आमदार सोडून जाऊ शकतात, मग उद्योजक राज्याबाहेर का जाणार नाहीत?; चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल
उद्धव ठाकरे यांनी अडिच वर्ष स्वत:ला बंदिस्त करून ठेवलं होतं. दोन्ही काँग्रेसला सांभाळण्यात त्यांचा वेळ जात होता. औद्योगिक गुंतवणुकीसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती आहे. या उपसमितीच्या बैठकाच होत नव्हत्या.
सांगली: उद्धव ठाकरे अडिच वर्ष मुख्यमंत्री होते. पण त्यांचा सर्व काळ काँग्रेस आणि शरद पवार यांना सांभाळण्यात गेला. त्यांना उद्योजकांशी काही घेणंदेणं नव्हतं. उद्धव ठाकरे बोलत नव्हते म्हणून त्यांना आमदार सोडून गेले. जर त्यांना आमदार सोडून जाऊन शकतात तर त्यांच्या काळात उद्योजक का सोडून जाऊ शकत नाहीत, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. सांगली येथे माध्यमांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा सवाल केला.
महाविकास आघाडीच्या अडिच वर्षांच्या काळातील चुकांमुळे औद्योगिक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले. पण त्याचे खापर मात्र आमच्या सरकारवर फोडण्यात येत आहे, असा हल्लाबोल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
राज्यात कोणताही उद्योग आणायचा असेल गुंतवणूक होऊ द्यायची असेल तर उद्योजकांशी बोलावं लागतं. त्यांच्या बैठका घ्याव्या लागतात. पण त्यासाठी मुख्यमंत्री उपलब्ध हवेत ना? उद्धव ठाकरे हे तर 18 महिने मंत्रालयात फिरकलेच नाहीत. एवढेच नव्हे तर सचिवांनाही मुख्यमंत्र्यांची भेट मिळण्यासाठी वाट पाहावी लागायची. तिथे उद्योग कसे येणार? असा सवाल त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी अडिच वर्ष स्वत:ला बंदिस्त करून ठेवलं होतं. दोन्ही काँग्रेसला सांभाळण्यात त्यांचा वेळ जात होता. औद्योगिक गुंतवणुकीसाठी मंत्रिमंडळाची उपसमिती आहे. या उपसमितीच्या बैठकाच होत नव्हत्या.
उद्योजकांना जागा दिली जात नव्हती. त्यांच्याशी करार होत नव्हते. उद्योजकांच्या मनातील प्रश्नांना उत्तरं दिली जात नव्हती. तत्कालीन आघाडी सरकारच्या या उदासीनतेमुळेच राज्यातील प्रकल्प राज्याबाहेर गेले, अशी टीका त्यांनी केली.
उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विचार घेऊन पक्ष चालवत आहेत. त्यावरून आगामी काळात उद्धव ठाकरे यांच्या व्यासपीठावर चार लोकांशिवाय कोणी दिसणार नाही. ही स्थिती येणार आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीची साथ म्हणजे शिवसेना आणि तुमचा विचार उद्ध्वस्त करणारा आहे. विचार उद्ध्वस्त करून त्यांनी काँग्रेसची साथ पत्करली आहे. त्यांनी आपल्या पक्ष आणि बाळासाहेबांच्या विचारांना मुठमाती दिलीय, अशी टीका त्यांनी केली.