अरे पेटवायला अक्कल लागत नाही… छगन भुजबळ यांची तोफ पुन्हा धडाडली
दोन्ही बाजूने आम्हाला अडचणीत आणत आहेत. एका बाजूला कुणबी सर्टिफिकेट घ्या आणि आरक्षण द्या म्हणत आहेत. तर दुसऱ्या बाजूला बाळासाहेब सराटे कोर्टात गेले आहेत. तुमचं आमचं आरक्षण चुकीचं आहे. ओबीसींना बाहेर काढा असं त्यांचं म्हणणं आहे. हायकोर्टात केस सुरू आहे. काय करायचं? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.
हिंगोली | 26 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर तोफ डागली. ओबीसी आरक्षणाचा इतिहास सांगतानाच मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. अरे पेटवायला अक्कल लागत नाही. पटवायला अक्कल लागते, असं म्हणत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. यावेळी ओबीसी आणि मराठा समाज प्रशासनात किती टक्के आहे, याची आकडेवारीच सादर केली.
हिंगोलीत आज ओबीसी समाजाची एल्गार परिषद सुरू आहे. या परिषदेतून मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार टोलेबाजी करत मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्ला चढवला. आमची एकच सभा झाली. तरीही त्यांना खटकलं. ते म्हणाले, भुजबळांचं खुट्टं उपटतो. खुटं उपटायला मी काय केलं रे मी. गप्प. चुपचाप. मला आलेल्या शिव्या गलिच्छ गलिच्छ होत्या. काही चॅनलवाले त्यांना म्हटलं तुमची हिंमत असेल तर वाचा. आणि महाराष्ट्राल कळू द्या मी चॅनलवाल्यांना सांगितलं. त्यांना पाच पंचवीस पानांचा मेसेज दिला. म्हणाले, आम्हाला वाचवत नाही. तुम्हाला एक शिवी वाचता येत नाही. मी आणि माझं कुटुंब दोन महिने या शिव्या वाचतो आणि ऐकतोय. आम्ही कसं जगायचं? असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.
भुजबळांनी एक दगडही मारला नाही
एक दगड कधी भुजबळांनी मारला नाही. टायर तरी जाळले का? त्यांनीच बीड पेटवलं. जे पेटवत आहेत. त्यांना बोला. पेटवायला अक्कल लागत नाही. पटवायला अक्कल लागते. जाळायला अक्कल लागत नाही. जुळवायला अक्कल लागते. मोडायला अक्कल लागत नाही घडवायला अक्कल लागते. काही आले नाही याचा अर्थ ते विरोधात आहे असं नाही, असं भुजबळ म्हणाले.
अधिकार की लडाई में
अधिकार की लडाई में निमंत्रण नही भेजे जाते, जिसका जमीर जिंदा है, वह खुद समर्थन में आ जाते है, याद रखो, हमारे हक्क पर जहाँ आच आये टकराना जरूरी है, तुम जिंदा हो तो जिंदा नजर में आना जरूर है, असा शेर ऐकवत भुजबळांनी जोरदार टीका केली.
तुही म्हातारा होशील
मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना म्हातारा झाल्याचं म्हटलं होतं. त्यावरूनही भुजबळ यांनी टीका केली. भुजबळ म्हातारा झालाच ना. सर्वच म्हातारे होणार. तुझे वडीलही म्हातारे झाले असतील. तूही होशीलच. पण हे केस पिकले ना, एका आंदोलनाने पिकले नाही. जेवढे केस आहेत ना तेवढी आंदोलने या भुजबळाने केली आहेत. जीवाची पर्वा न करता आंदोलने केली आहेत. आंदोलन भुजबळांना नवीन नाही, असं भुजबळ म्हणाले.