मी काय तुमच्या हातातील खेळणं आहे का? छगन भुजबळ यांचा राष्ट्रवादीतील त्रिमूर्तींना संतप्त सवाल
शेपूट घालून बोलू का? रोखठोकच बोलणार. माझी सवय आहे. शिवसेनेत असल्यापासून मी रोखठोक बोलत असतो. लासलगाव माझा मतदारसंघ आहे. समता परिषदेचे नेते आणि कार्यकर्ते आहेत. त्यांच्याशी बोलेन. नंतरच माझा निर्णय घेईल. पण एक सांगतो, जहां नहीं चैना वहां नहीं..., असं सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलं आहे.
मंत्रिपद मिळालं नसल्याने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाराज आहेत. भुजबळ यांनी आपली नाराजी जाहीरपणे बोलून दाखवत पक्ष सोडण्याचे संकेतही दिले आहेत. मात्र, भुजबळ हे खरोखरच मंत्रिपदासाठी नाराज आहेत का? असा सवाल छगन भुजबळ यांना केला असता त्यांनी वेगळाच गौप्यस्फोट करून खळबळ उडवून दिली आहे. मी अनेक पदं भूषविली आहेत. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेतेपदही भूषविलं आहे. मी काही मंत्रिदावरून नाराज नाही. मला ज्या पद्धतीने पक्षात वागणूक दिली जात आहे. त्यामुळे मी नाराज आहे. मी काय तुमच्या हातातील खेळणं आहे का? असा संतप्त सवाल केला आहे. त्यांनी अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या राष्ट्रवादीतील त्रिमूर्तींना हा सवाल केला आहे.
छगन भुजबळ यांनी टीव्ही9 मराठीशी खास संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षांतर्गत सुरू असलेल्या कार्यपद्धतीवरच बोट ठेवलं. मी ज्येष्ठ आमदार आणि मंत्री आहे. मी शोभेचं मंत्रिपद स्वीकारलं नाही. मंत्री म्हणून मी नेहमीच अॅक्टिव्ह राहिलो. त्यामुळे केवळ शोभेसाठी मंत्रिपद घेतलं नाही. या निवडणुकीत ओबीसी समाज महायुतीच्या पाठी होता. लाडकी बहीण होती. त्यामुळे आम्हाला प्रचंड बहुमत मिळालं. आम्हाला वाटलं राष्ट्रवादीचे 30 आमदार कसे तरी येतील. एकदम 40 आले. बाकीच्या पक्षांचेही आमदार आले. असं असताना मला डावलण्याचं काही कारण नव्हतं. मंत्रिमंडळात जुनं आणि नवीन यांचा मेळ घालावा लागतो. जुने झाले द्या फेकून असं चालत नाही, असा घणाघाती हल्लाच छगन भुजबळ यांनी चढवला.
नाव जाहीरच केलं नाही
लोकसभा निवडणुकीला मला उभं राहायंच नव्हतं. तरीही मला उभं राहायला सांगितलं. मी तयार झालो. त्यानंतर मी माझ्या मतदारसंघात मेहनत घेतली. तयारी करूनच अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना भेटायला गेलो. पण त्यांनी चुप्पी साधली. अजितदादा, तटकरे, पटेल सांगायचे तुम्ही लढलं पाहिजे. मोदी आणि अमित शाह यांचा निरोप आहे. त्यामुळे मी राहिलो उभा. नंतर यांनी माझं नाव जाहीर केलं नाही. एक महिना झाला तरी नाशिकमधून माझं नाव जाहीर केलं नाही. ह्युमीनेशन सुरू होतं. त्यामुळे मीही मग लोकसभा न लढवण्याचा निर्णय घेतला, असं भुजबळ म्हणाले.
मताधिक्य घटलं
राज्यसभेच्या दोन जागा होत्या. त्यातील एक जागा सुनेत्रा ताईंना सोडली. नितीन पाटील यांना दुसरी जागा दिली. काय तर म्हणे, तुला खासदार करेन असं मी नितीन पाटील यांना जाहीर सभेत सांगितलं होतं. त्यामुळे त्याला राज्यसभा दिली. मी मनात म्हटलं, अरे वा… त्यावेळी मला राज्यसभा दिली नाही. नंतर मला म्हणाले तुम्ही विधानसभा लढवा. तुमच्यामुळे पक्ष मजबूत होईल. मी राहिलो उभा. मनोज जरांगे पाटील सकाळी 10 वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत माझ्या विरोधात फिरत होते. त्यामुळे फरक पडला. माझं 30 हजाराने मताधिक्य घटलं. कांटे की टक्कर झाली. पण मी निवडून आलो, असंही ते म्हणाले.
सोन्याचं पानही नको
आता मंत्रिपदाची शपथ घेण्याची वेळ आली तेव्हा म्हणाले राजीनामा द्या, राज्यसभेवर जा. आम्ही नितीन पाटीलचा राजीनामा घेतो. का तर त्यांच्या भावाला मकरंदला मंत्री करायचं आहे. मला काय लहान पोरासारखं खेळवता? मी खेळणं आहे का तुमच्या हातातील? अॅडजस्टमेंट करायची म्हणून राजीनामा द्यायला सांगता? मान नाही तिथे सोन्याचं पान दिलं तरी काय करायचं मला? असा भावनिक सवालही त्यांनी केला.