मुंबईत थांबा, मुख्यमंत्र्यांचे आमदारांना फोन, थोड्याच वेळात ‘वर्षा’वर बैठक; राजकीय घडामोडींना वेग
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. विस्ताराच्या पार्श्वभूमीवर अनेक आमदारांनी मुंबईत तळ ठोकला आहे.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा सुटला आहे. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली वाढल्या आहेत. आजच दुपारपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आमदारांची मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू झाली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आमदारांना फोन केले आहेत. तसेच वर्षा निवासस्थानी तातडीची बैठकही बोलावली आहे.
केंद्राकडून मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील मिळाल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आज किंवा उद्या कोणत्याही क्षणी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे गटाकडून चार मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या संभाव्य मंत्र्यांना आणि इतर आमदारांना मुंबईतच राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबईतच थांबा, कुठे जाऊ नका, असा फोनच मुख्यमंत्र्यांनी कालच या आमदारांना केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
वर्षावर तातडीची बैठक
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकाळी 10 वाजता वर्षा निवासस्थानी आमदारांची बैठक बोलावली आहे. कोणत्या आमदारांना मंत्रिपदे दिली जाणार आहे आणि कोणती खाती दिली जाणार आहेत, याची माहिती या बैठकीत दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील राजकीय परिस्थिती आणि बदललेली समीकरणे याची माहितीही या बैठकीत दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
शहाजी बापू मुंबईत, बच्चू कडू अमरावतीत
दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा फोन आल्यानंतर अनेक आमदार मुंबईत आले आहेत. शहाजीबापू पाटील यांनीही मुंबई गाठली आहे. दातांची ट्रीटमेंट सुरू असतानाही शहाजीबापू पाटील मुंबईत आले आहेत. बच्चू कडू यांनाही मुख्यमंत्र्यांनी फोन करून मुंबईत बोलावले होते. पण बच्चू कडू मुंबईत गेले नाहीत. ते अमरावतीतच थांबले आहेत. त्यामुळे बच्चू कडूंना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याची चर्चा आहे. बच्चू कडूही नाराज असून ते सकाळी 11 वाजता आपला निर्णय जाहीर करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
चार मंत्री कोण?
दरम्यान, शिंदे गटाकडून योगेश कदम, अनिल बाबर आणि भरत गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. तसेच संजय शिरसाट आणि संजय रायमूलकर या दोघांपैकी एकाचा मंत्रिमंडळात समावेश केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. फक्त चारच जणांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याने बंड करून आलेल्या आमदारांचा चांगलाच हिरमोड होणार असून धुसफूस वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.