Chipi Airport : चिपी विमानतळाचं उदघाटन नेमकं कधी? शिवसेना म्हणते 7 ऑक्टोबर, राणेंची तारीखही जाहीर
9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याची घोषणा राणे यांनी आज केलीय. दरम्यान, शिवसेनेकडून 7 ऑक्टोबरला चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : कोकणातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी याबाबत घोषणा केली आहे. 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याची घोषणा राणे यांनी आज केलीय. दरम्यान, शिवसेनेकडून 7 ऑक्टोबरला चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे या मुद्द्यावरुन शिवसेना विरुद्ध भाजप असं चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. (Chipi Airport to be inaugurated on 9 October 2021, announcement by Narayan Rane)
9 ऑक्टोबर रोजी चिपी विमानतळावरुन विमान वाहतूक सुरु होईल. नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या उपस्थितीत 9 ऑक्टोबरला दुपारी 12.30 वाजता सिंधुदुर्गात हा कार्यक्रम होणार आहे. त्यावेळी आपण स्वत: आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित असतील, अशी माहिती राणे यांनी दिलीय. सात वर्षापासून विमानतळ बांधून तयार होतं. आज सकाळी ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटलो. त्यांची वेळ घेतली. त्यानंतर मी विमानतळाच्या उद्घाटनाची तारीख जाहीर करत असल्याचं राणे म्हणाले. सिंधुदुर्ग, मुंबई आणि अन्य ठिकाणी विमान वाहतूक सुरु होईल असंही राणे म्हणाले.
दरम्यान, शिवसेनेकडून 7 ऑक्टोबर रोजी विमानतळाचं उद्घाटन होईल असं सांगण्यात आलंय. या बाबत विचारलं असता क्रेडीट घेण्याचा प्रश्न नाही. 2014 पासून विमानतळ आम्ही बांधलं. आम्ही स्थानिक नाहीत का? त्यामुळे आम्ही विमानतळाचं उद्घाटन करणार असं राणे यांनी सांगितलं आहे.
उद्घाटनाला मुख्यमंत्री नसतील?
दरम्यान, या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असतील का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावेळी विमानतळाचे उद्घाटन संबंधित खात्याचे केंद्रीय मंत्री असलेले ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची गरज नसल्याचं राणे म्हणालेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना डावलून चिपी विमानतळाचं उद्घाटन होणार असल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान, खासदार विनायक राऊत यांनी याबाबत आपण पत्रव्यवहार केल्याचं म्हटलं होतं. त्याबाबत विचारलं असता फक्त पत्रव्यवहार करुन उद्घाटन होत नसतं, असा खोचक टोला राणेंनी लगावलाय.
विनायक राऊतांकडून 7 ऑक्टोबरची तारीख जाहीर
दरम्यान, 7 ऑक्टोबरपासून चिपी विमानतळावरून विमानांचं उड्डाण सुरू होईल अशी माहिती शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी दिली होती. तसंच या कामाचं श्रेय कोकणातील जनतेलाच असल्याचंही विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं होतं. चिपी विमानतळ सुरू करण्यास अखेर डीजीसीआयची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग ते मुंबई हा प्रवास अवघ्या 2500 रुपयात होणार आहे. कार्यवाही वेळेत पूर्ण होऊ शकली नाही म्हणूनच मी पुन्हा एकदा दिल्लीला गेलो होतो. आम्ही हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना भेटलो. त्यांना चिपी विमानतळाचे काम पूर्णपणे झालेले आहे. लायसन्स मिळालेलं आहे असं सांगितल्याचं विनायक राऊत यांनी स्पष्ट केलं.
इतर बातम्या :
Chipi Airport to be inaugurated on 9 October 2021, announcement by Narayan Rane