Eknath Shinde : प्रकृतीची विचारपूस की शिंदे गटात येण्याची ऑफर?, एकनाथ शिंदे थेट गजानन किर्तीकर यांच्या भेटीला; चर्चा तर होणारच
Eknath Shinde : एकनाथ शिंदे हे गजनान किर्तीकर यांच्या घरी गेले आहेत. त्यांच्या प्रकृतीची ते विचारपूस करणार आहेत. या भेटीवेळी शिवसेनेतील फुटीवरही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. किर्तीकर हे अत्यंत जुने शिवसैनिक आणि नेते आहेत. शिवसेनेत त्यांच्या शब्दाला किंमत आहे.
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे शिवसेना नेते आणि खासदार गजानन किर्तीकर (gajanan kirtikar) यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत. किर्तीकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. आजारपणामुळे ते राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदान करायला दिल्लीत गेले नव्हते. स्वत: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी किर्तीकर आजारी असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे किर्तीकर यांची भेट घेण्यासाठी आले असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, शिवसेना आणि शिंदे गटात सुरू असलेल्या राजकीय वर्चस्वाच्या लढाईच्या पार्श्वभूमीवर या भेटीलाही राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे. शिंदे किर्तीकरांच्या प्रकृतीची विचारपूस करायला आले की त्यांना शिंदे गटात येण्याची ऑफर देण्यासाठी आले आहेत? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. शिंदे यांनी अचानक किर्तीकरांच्या घराकडे कूच केल्याने शिवसेनेत चांगलीच खळबळ उडाली आहे.
एकनाथ शिंदे हे गजनान किर्तीकर यांच्या घरी गेले आहेत. त्यांच्या प्रकृतीची ते विचारपूस करणार आहेत. या भेटीवेळी शिवसेनेतील फुटीवरही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. किर्तीकर हे अत्यंत जुने शिवसैनिक आणि नेते आहेत. शिवसेनेत त्यांच्या शब्दाला किंमत आहे. त्यामुळे शिंदे त्यांच्याकडे शिवसेना फुटीवर चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यांची भूमिका स्पष्ट करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. या भेटीनंतर शिवसेनेत काही हालचाली होण्याच्या शक्यता नाकारता येत नसल्याचं सूत्रांनी सांगितलं.
शिंदे गटात येण्याची ऑफर?
शिवसेनेतील 12 खासदारांनी संसदेत सवतासुभा मांडला आहे. या सर्व खासदारांनी एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व मान्य केलं आहे. राज्यात भाजपने शिंदे गटाला मुख्यमंत्रीपद दिलं. केंद्रातही शिंदे गटाला दोन मंत्रिपदे दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आजच्या भेटीत शिंदे किर्तीकरांना शिंदे गटात येण्याची ऑफर देऊन केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर देऊ शकतात, असं सांगितलं जात आहे. त्यामुळेही या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेना ताब्यात घेण्यासाठीचा प्रयत्न?
गजानन किर्तीकर हे शिवसेनेचे नेते आहेत. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत आहेत. शिंदे गटाला शिवसेनेवर दावा सांगायचे असेल तर राष्ट्रीय कार्यकारिणीतील निम्याहून अधिक लोक आपल्या बाजूने असल्याचं दाखवावं लागणार आहे. त्यामुळेही शिंदे यांची किर्तीकरांसोबतची भेट महत्त्वाची मानली जात आहे. किर्तीकर जर शिंदे गटात आले तर शिंदे गट अधिक बळकट होईल. शिवाय शिवसेनेच्या कार्यकारिणीत आणखी फूट पडू शकते. त्यादृष्टीने शिंदे यांचे प्रयत्न सुरू असल्याचंही सांगितलं जात आहे.