Eknath Shinde : सकाळचा 8 वाजताचा भोंगा बंद झाला; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊतांवर टीका
Eknath Shinde : आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापेक्षा चांगला प्रतिसाद तुम्हाला मिळतोय का? असा सवाल एकनाथ शिंदे यांना करण्यात आला. त्यावर, मी कुणाच्या कामाची तुलना माझ्यासोबत कधी केली नाही आणि करणार नाही. माझं काम लोकांना न्याय देण्याचं, राज्याला पुढे नेण्याचं आहे.
औरंगाबाद: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांना ईडीने (ED) अटक करण्यात आली आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोचरी टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबद दौऱ्यावर आहेत. काल रात्री ते एका जाहीर सभेला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी, अरे भोंगा नीट करा… माझा आवाज येतोय का? (येतोय येतोय… जनतेतून आवाज) आता आवाज येणारच नाही. सकाळी 8 वाजताचा भोंगा बंद झाला,. भोंगा आत गेला, असं एकनाथ शिंदे म्हणाले. त्यावर सभेला आलेल्या लोकांनी टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून प्रचंड जल्लोष केला. राऊतांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. हे प्रकरण ईडीच्या हातात आहे. त्यामुळे चौकशीतूनच सत्य बाहेर येईल. कर नाही, त्याला डर कशाला? असं राऊत म्हणत होते. त्यामुळे त्यांनी घाबरू नये, असा चिमटाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी काढला.
कालपासून दौरा होता. खूप काही निर्णय घेतले. आता मी परत चाललोय. लोकांच्या हिताचे काही निर्णय होते. ते घेतले. छोट्या-मोठ्या कारणामुळे ते विषय प्रलंबित होते. ते जागेवरच स्पॉटवर सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. योजना प्रलंबित असलेल्या ठिकाणी चालना दिलेली आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना, रेल्वेचे काही विषय होते, रस्ता किंवा जागेचे काही विषय होते त्याबाबतीत जलद गतीने मार्ग काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
लोकांचा प्रतिसाद मिळतोय यातच सर्व काही आलं
काल रात्रीपासून चौका चौकामध्ये हजारोंच्या संख्येने लोक प्रतिसाद देत होते. आम्ही जी काय भूमिका स्वीकारली ती बाळासाहेबांच्या विचारातूनच स्वीकारली आहे. बाळासाहेबांचा अजेडा पुढे घेऊन जात आहोत. तो लोकांनी स्वीकारला आहे. म्हणूनच एवढा मोठया प्रमाणावर जनतेचा प्रतिसाद मिळतोय, असं त्यांनी सांगितलं.
कुणाच्या कामाशी तुलना करत नाही
आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यापेक्षा चांगला प्रतिसाद तुम्हाला मिळतोय का? असा सवाल एकनाथ शिंदे यांना करण्यात आला. त्यावर, मी कुणाच्या कामाची तुलना माझ्यासोबत कधी केली नाही आणि करणार नाही. माझं काम लोकांना न्याय देण्याचं, राज्याला पुढे नेण्याचं आहे. त्यामुळे या दौऱ्याची कुणासोबत तुलना करणे मला आवश्यकता वाटत नाही. आम्ही जाताना टपरीवाल्या कार्यकर्त्याचा फोन आला होता. सोबत दानवे साहेब, अब्दुल सत्तार होते. रूटवर असल्यामुळे त्या कार्यकर्त्याला भेटलो आणि त्याच्याकडील चहा घेतला, असंही त्यांनी सांगितलं.