आम्ही तीन महिन्यांपूर्वीच फटाके फोडले, ‘ते’ आजही डेसिबल मोजताहेत; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना राजकीय टोलेबाजीही केली.
ठाणे: राज्यात दिवाळीचा (diwali) जल्लोष सुरू आहे. फटाके फोडून सर्वच जण दिवाळीचा आनंद लुटत आहेत. एकीकडे राज्यभरात दिवाळीचे फटाके फुटत असतानाच राज्यात राजकीय फटाकेही फुटत आहेत. दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमाला हजेरी लावताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) हे विरोधकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्यावर नाव न घेता ते घणाघाती टीका करत आहेत. तसेच बंड करण्याची वेळ का आली हे सांगत ते आपली बाजू मांडतानाही दिसत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित करताना राजकीय टोलेबाजीही केली. कालपासून दिवाळीचे फटाके फुटत आहेत. पण आम्ही तीन महिन्यांपूर्वीच फटाके फोडलेत. त्याचा आवाज आजही घुमतो. विरोधक म्हणणार नाही. पण आमचे जे काय हितचिंतक आहेत ते त्या फटाक्याच्या आवाजाचा डेसिबल आजही मोजत आहेत. मोजू देत. आम्ही बेधडक कार्यक्रम केला, अशी टोलेबाजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली आहे.
एकनाथ शिंदे यांनी काल सुद्धा ठाण्यातील दिवाळी पहाट कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळीही त्यांनी टोलेबाजी केली. टीम इंडियाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला होता. त्यावरून त्यांनी कोटी केली. टीम इंडियाने मॅच जिंकली. काल जशी टीम इंडियाने मॅच जिंकली तशीच मॅच आम्ही तीन महिन्यांपूर्वी खेळलो आणि जिंकलो. ही मॅच फक्त महाराष्ट्रानेच नाही तर संपूर्ण देशाने पाहिली, अशी टोलेबाजी शिंदे यांनी केली होती. शिंदे यांच्या या फटकेबाजीला ठाणेकरांनी हसून मनमुराद दाद दिली होती.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याचे दौरे सुरू केले आहेत. त्यांनी औरंगाबादला जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. त्यांच्या या दौऱ्याने सत्ताधाऱ्यांची पळताभूई थोडी झाली असून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका सुरू केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी 24 मिनिटात काय पाहणी दौरा केला? असा सवाल शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केला. तर, आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.