CM Uddhav Thackeray : सरकारचं काही खरं नाही, आता शिवसेना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात, दुपारी जिल्हा प्रमुखांशी बोलणार, सायंकाळी नगरसेवकांशी
CM Uddhav Thackeray : मुंबईत ठाकरे नावाचा करिश्मा आहे. ठाकरेंच्या नावावरच मते मिळतात. शिवाय शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांना अधिक मानतात.
मुंबई : शिवसेनचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड केल्यानंतर शिवसेना संपूर्ण हादरून गेली आहे. शिंदे यांनी 50 हून अधिक आमदारांना घेऊन आसाम गाठलं आहे. त्यानंतर आमचीच शिवसेना (shivsena) खरी असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. शिंदे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आता शिवसेनेच्या चिन्हावरच हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिवसेनेचं राज्यातील अस्तित्वच धोक्यात आलं आहे. या शिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख म्हणूनही कस लागणार आहे. उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांच्यासाठी हा काळ कसोटीचा आहे. त्यामुळे आता पक्षाची अधिक पडझड होऊ नये, ग्रासरूटला आणि महापालिका पातळीवर पक्ष आबाधित राहावा यासाठी उद्धव ठाकरे यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई महापालिकेतील नगरसेवक आणि जिल्हाप्रमुख तसेच जिल्हा संपर्क प्रमुखांच्या बैठका बोलावल्या आहेत. आज दिवसभर या बैठका होणार आहेत. त्यामुळे या बैठकीत काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची महत्वाची बैठक आज होणार आहे. आज दुपारी 12 वाजता शिवसेना भवनात ही बैठक होणार आहे. उद्धव ठाकरे हे साडे अकराच्या सुमारास ही बैठक होणार आहे. तर उद्धव ठाकरे हे मुंबई महापालिकेतील नगरसेवकांशी संध्याकाळी संवाद साधणार आहेत.
महापालिकेतील किती नगरसेवक ठाकरेंसोबत?
मुंबई महापालिकेतील काही नगरसेवकही शिंदे यांच्या गळाला लागल्याचं सांगितलं जात आहे. आमदार यामिनी जाधव या शिंदे यांच्या गटात सामिल झाल्या आहेत. यामिनी जाधव या माजी नगरसेविका आहेत. त्यांचे पती यशवंत जाधव हे महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आहेत. त्यामुळे जाधव यांच्याकडून शिवसेनेचे नगरसेवक फोडले जाऊ नयेत म्हणूनही ठाकरेंकडून खबरदारी घेतली जात आहे. मात्र, मुंबईतले फारसे नगरसेवक शिंदेंच्या गटात सामिल होणार नसल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबईत ठाकरे नावाचा करिश्मा आहे. ठाकरेंच्या नावावरच मते मिळतात. शिवाय शिवसैनिक हे उद्धव ठाकरे यांना अधिक मानतात. मुंबईत शिंदे यांचं वर्चस्व जवळपास नाहीच आहे. त्यामुळे शिंदे यांच्यासोबत नगरसेवक जाऊन महापालिका निवडणुकीत स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेणार नाहीत, असं राजकीय जाणकार सांगतात. मात्र, शिवसेनेसाठी या दोन्ही बैठका अत्यंत महत्त्वाच्या असल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.