यशाची शिखरं पादाक्रांत करताना पायाची दगडं का निसटत आहेत?; खडसेंच्या राजीनाम्यावरून मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला कोपरखळी लगावली आहे. यशाची शिखरं पादाक्रांत करत असताना पायाची दगडं का निसटत आहेत, याचा विचार भाजपनं करावा, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
उस्मानाबाद: ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला कोपरखळी लगावली आहे. यशाची शिखरं पादाक्रांत करत असताना पायाची दगडं का निसटत आहेत, याचा विचार भाजपनं करावा, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. (cm uddhav thackeray reaction on eknath khadse resign)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज तुळजापूर येथील अतिवृष्टीग्रस्त गावांची पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्यावर भाष्य केलं. एकनाथ खडसे महाविकास आघाडीच्या कुटुंबात येत आहेत. त्याचं स्वागतच आहे. ते स्पष्ट वक्ते आहेत आणि लढवय्ये आहेत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी भाजपची पाळंमुळं रोवली आहेत. त्यामुळे खडसेंसारखा नेता पक्ष का सोडतो, पक्षाची पाळंमुळं रोवणारी माणसे का सोडून जात आहेत? याचा विचार भाजपने केला पाहिजे. यशाची शिखरं पादाक्रांत करताना पायाचे दगड ठिसूळ का होत आहेत. दगडच निसटले तर कसे होईल? याचा भाजपने विचार करावा. नवीन अंकूर फुटताना मूळंच का उखडली जाताहेत, याचाही त्यांनी विचार करावा. आम्ही एकेकाळी त्यांचे मित्र होतो. त्यामुळे त्यांना हा माझा मित्रत्वाचा सल्ला आहे, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी काढला.
मी कधीच दु:खात नसतो. मी दु:खावर वार करणारा नेता आहे. मी मैत्री पाळणारा आहे. जुन्या मित्राचं नुकसान होत असताना त्यांना सावध करणं हे माझं कर्तव्य समजतो, असा टोलाही त्यांनी लगावला. आम्ही भाजपची साथ सोडली. त्यानंतर अकाली दलानेही सोडली. आता खडसेही बाहेर पडलेत, असंही ते म्हणाले. (cm uddhav thackeray reaction on eknath khadse resign)
खडसेंना सांगितलं बंद दाराआड चर्चा करा
खडसे तुम्हाला मध्यंतरी भेटलो होते. त्यावेळी तुम्ही त्यांच्याशी काय चर्चा केली? असा सवाल मुख्यमंत्र्यांना करण्यात आला. त्यावर जी चर्चा करायची ती बंद दाराआड करा, असं मी खडसेंना सांगितलं होतं, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. तसेच जे लोक आमच्याकडे येतील त्यांचं आम्ही स्वागतच करू, असंही ते म्हणाले.
मंत्रिपदाचं नंतर ठरवू
नाथाभाऊंना मंत्रिमंडळात कोणतं खातं दिलं जाईल? असा सवाल मुख्यमंत्र्यांना यावेळी करण्यात आला. तेव्हा आधी मला खडसे दिसू द्या. त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात काय स्थान द्यायचं ते ठरवू, असं सांगत मुख्यमंत्र्यांनी खडसेंना मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत.
CM Uddhav Thackeray Osmanabad Visit Live | यशाची शिखरं सर करताना, पाया का ठिसूळ होतोय त्याचा विचार करा, खडसेंच्या प्रवेशावरुन मुख्यमंत्र्यांचा भाजपला सल्लाhttps://t.co/PjiwCD5Idz
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 21, 2020
संबंधित बातम्या:
ओहोटी संपली आता भरती येणार, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर रोहित पवारांचे सूचक ट्विट
एकवेळ मरण पत्करेन पण भाजप सोडणार नाही, खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर प्रकाश मेहतांचा निर्धार
…म्हणून मोदींवर टीका करणारं ‘ते’ ट्विट डिलीट केलं : एकनाथ खडसे
(cm uddhav thackeray reaction on eknath khadse resign)