कोकणचा कॅलिफोर्निया करु म्हणणारे अनेकजण आले आणि गेले, उद्धव ठाकरेंचा राणेंवर प्रहार
चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या मंचावर नारायण राणे यांनी जोरदार भाषण ठोकलं. मुख्यमंत्र्याचं तीन वेळा आणि आदित्य ठाकरे यांचं दोन वेळा त्यांनी आपल्या भाषणात नाव घेतलं. तसंच कोकणातील शिवसेनेच्या नेत्यांवर त्यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्र्यांच्या समोरच जोरदार आसूड ओढले. राणेंच्या भाषणाचा हिशेब मुख्यमंत्र्यांनी आपली वेळ येताच चुकता केला.
सिंधुदुर्ग : चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या मंचावर नारायण राणे यांनी जोरदार भाषण ठोकलं. मुख्यमंत्र्याचं तीन वेळा आणि आदित्य ठाकरे यांचं दोन वेळा त्यांनी आपल्या भाषणात नाव घेतलं. तसंच कोकणातील शिवसेनेच्या नेत्यांवर त्यांनी आपल्या भाषणातून मुख्यमंत्र्यांच्या समोरच जोरदार आसूड ओढले. राणेंच्या भाषणाचा हिशेब मुख्यमंत्र्यांनी आपली वेळ येताच चुकता केला. कोकणचा कॅलिफोर्निया करु म्हणणारे अनेकजण आले आणि गेले, पण बाळासाहेबांनी त्यावेळी सांगितलं होतं, कॅलिफोर्नियालाही अभिमान वाटेल, असं कोकण आपण करु, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राणेंवर पलटवार केला. त्याचक्षणी उपस्थित शिवसैनिकांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला.
प्रोटोकॉलप्रमाणे मुख्यमंत्र्यांअगोदर नारायण राणे यांनी भाषण केलं. आपल्या भाषणात त्यांनी कुणाचाही मुलाहिजा न बाळगता सेना नेत्यांवर तुफान हल्ला चढविला. यावेळी भाजपचे प्रमुख कुणीही नेते मंचावर उपस्थित नाहीत,हे ते विसरुन गेले होते. सुरुवातीला भाजप नेते उपस्थित राहणार नाहीत, म्हणून ते बॅकफूटला गेल्याची चर्चा होती. पण राणेंनी जोरदार भाषण करत आंदोलनाला विरोध करणारे आज स्टेजवर उपस्थित आहे, असं म्हणत सेना नेत्यांवर प्रहार केला. राणेंनी आपल्या भाषणात तीनवेळा उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं तसंच सेना नेत्यांचा समाचार घेण्याची एकही संधी सोडली नाही. मुख्यमंत्र्यांच्या भाषणाची वेळ येताच त्यांनी राणेंचा व्याजासकट हिशेब चुकता केला.
“एवढे वर्ष विमानतळाला का लागले?, आमचं सरकार आलं की प्रश्न मार्गी लागला”
“एवढे वर्ष विमानतळाला का लागले? आम्ही कोकणचं कॅलिफोर्निया करु असे काहीजण म्हणाले होते. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की, कॅलिफोर्नियाला अभिनमान वाटेल असं कोकण उभं करु. बाकीच्या गोष्ट आदित्यने सांगितल्या आहेत. पाठांतर करुन बोलणं वेगळं, आत्मसात करुन तळमळीने बोलणं वेगळं आणि मळमळीने बोलणं आणखी वेगळं असतं. त्याबद्दल मी नंतर बोलेल”, असं म्हणत त्यांनी राणेंचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.
सिंधियाजी आपण अधिक तळमळीने बोललात, राणेंसमोर मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
सिंधिया महाराष्ट्राच्या अनेक विमानतळांबद्दल भरभरुन बोलले. तुमचं अभिनंदन करतो. इतक्या लांब राहूनही मराठी मातीचा संस्कार आपण जपलात. मला वाटत होतं की मी केंद्रीय मंत्री आहे आणि तुम्ही मुख्यमंत्री आहात. पण इथे राजकारण येणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले. तसंच सिंधिया विमानतळाबद्दल अधिक तळमळीने बोलले, असं मुद्दामहून सांगत त्यांनी राणेंवर निशाणा साधला.
गोव्यापेक्षा कोकण कमी नाही
आजचा दिवस हा महत्त्वाचा दिवस आहे, आदळआपट करण्याचा नाही. आपलं कोकण महाराष्ट्राचं वैभव आहे ते आपण जगासमोर नेत आहोत. जगातून अनेक पर्यटक इथे यावेत यासाठी सुविधा असण्याची गरज आहे. त्या सुविधांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग हा विमानतळ असतो. आपण गोव्याच्या विरोधात नाही. पण आपलं वैभव कमी नाही. उलट आपण काकणभर सरस आहोत. कमी अजिबात नाहीत.
(Cm Uddhav thackeray Slam union minister narayan Rane maharashtra Sindhudurg Chipi Airport inauguration Over konkan california)
हे ही वाचा :
माझ्यासाठी आदित्य ठाकरे टॅक्स फ्री; राणेंचे आदित्य यांना चिमटे आणि सल्ला
भाषणातील पहिल्याच वाक्यात उद्धव ठाकरेंकडून राणेंच्या टीकेची सव्याज परफेड, म्हणाले…