नाशिकचा अपघात खड्ड्यांमुळेच; काँग्रेस नेते नाना पटोले यांचा दावा
शिवसेना फोडल्यानंतरचं भाजप दुरून सर्व तमाशा पाहत असल्याचं चित्रं आपण पाहतोय. दुसऱ्यांचे घर तोडणे हा भाजपचा धंदा होता आणि ते यात यशस्वी झाले आहेत.
दत्ता कानवटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, औरंगाबाद: नाशिक येथे झालेल्या खासगी बस आणि ट्रकच्या अपघातावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यातील रस्ते खराब आहेत. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. खड्डे वाचवण्याच्या नादात अपघात होतात. नाशिकचा (nashik) अपघातही खड्ड्यांमुळेच झाला आहे, असं विधान नाना पटोले यांनी केलं आहे. नाना पटोले यांनी नाशिकच्या अपघाताला (accident) थेट खड्ड्यांनाच जबाबदार धरलं आहे. दरम्यान, अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हे विधान केलं. महाराष्ट्रातील रस्त्यांची परिस्थिती या अपघातामुळे पुन्हा एकदा समोर आली आहे. रोज अपघातांसारखा जीवघेणा प्रकार सुरू आहे. हे सर्व पाप राज्यातील ईडीच्या म्हणजे भाजप प्रणित सरकारचं आहे. महाविकास आघाडीच्या काळात झालेली कामे, बजेटमध्ये झालेली कामे बंद करून टाकली. काही कामांना स्थगित दिली. यामुळे कामे झाले नाहीत. कामेच बंद असल्याने रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्डे वाचवण्यासाठी हा प्रकार होतो आणि यामुळेच आता हा अपघात झाला आहे. किती लोकांचा जीव राज्याचे ईडीचे भाजप प्रणित सरकार घेणार? असा सवाल नाना पटोले यांनी केला आहे.
शिवसेना फोडल्यानंतरचं भाजप दुरून सर्व तमाशा पाहत असल्याचं चित्रं आपण पाहतोय. दुसऱ्यांचे घर तोडणे हा भाजपचा धंदा होता आणि ते यात यशस्वी झाले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटाचा विषय आहे. संभ्रम न्यायालय निर्माण करतेय. चिन्हाचा विषय पुन्हा निवडणूक आयोगाकडे पाठवला. न्यायव्यवस्थेसंदर्भात संभ्रम निर्माण होणे हे लोकशाहीला घातक आहे. ज्याचे अधिकार असतील ते अधिकारापर्यंत असावेत, असं ते म्हणाले.
केंद्राचे सरकार ओबीसींवर वारंवार अन्याय करत आहे. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे. समाजाला जागृत करणे हेच ओबीसी मेळाव्याचे ध्येय आहे. ओबीसींमध्ये भाजपच्या विरोधात राग दिसतोय, असं त्यांनी सांगितलं.
राज्य सरकारचे 100 दिवस पूर्ण होत आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मतदारांनी प्रलोभनाला बळी पडून भाजपला निवडून दिलं. पण हे सरकार राज्यात अस्थिरता निर्माण करत आहे. महाविकास आघाडीला त्रास देण्याचं काम सुरू आहे.
भ्रष्टाचार, भय आणि भूक देण्याचा संकल्प भाजपने केला आहे. लोकांचा कल भाजपच्या विरोधात आहे. महाराष्ट्रातील वेदांता सारखे प्रकल्प गुजरातला देण्यात आले आहेत, यावरून हे सरकार कोणत्या दिशेने जात आहे हे दिसून येते, असं ते म्हणाले.