Breaking : प्रभू श्रीराम, शंकराचार्य, रामदास स्वामींनंतर यात्रा करणारे राहुल गांधी चौथे: नाना पटोले
कोरोनाच्या काळात साधूंना मारलं असा भाजपने गवगवा केला. आता भाजपचे गृहमंत्री आहेत. स्वत:ला हिंदुसम्राट म्हणून घेणारे सत्तेत आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही. सांगलीत झालेल्या घटनेचा निषेध करतोय, असं त्यांनी सांगितलं.
नागपूर: भगवान श्रीराम, पहिले शंकराचार्य आणि रामदास स्वामी यांनी कन्याकुमारी ते कश्मीर यात्रा केली. त्यानंतर ही यात्रा करणारे राहुल गांधी (rahul gandhi) हे चौथे आहेत, असं सांगतानाच राहुल गांधी यांना हिंदुत्वाबाबत (hindu) प्रमाणपत्र देणारे कोण?, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची यांची योग्यता नाही. ते धर्माचं काम करतायत. राहुल गांधी यांच्या टी शर्टची चर्चा केली जाते. तेव्हा शहा यांच्या मफलरची आणि मोदी यांच्या सुटाबुटाची चर्चा होतेय, असा हल्लाबोलही नाना पटोले यांनी केला.
नाना पटोले हे मीडियाशी संवाद साधत होते. वेदांता प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याने त्यावरून राजकारण सुरू झालं आहे. त्यावरही नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी राज्याचं हस्तक असायला हवं. पण ते मोदी-शहा म्हणतात तसं ऐकतात. आपल्या राज्यातलं पाणी गुजरातला पाठवलं. गुजरातच्या नेत्यांचा आशीर्वाद राहीला पाहिजे, म्हणून महाराष्ट्रातील भाजप नेते हे करतायत, असा आरोप करतानाच उद्या मुंबईत गुजरातमध्ये गेली तर नवल वाटायला नको, असं नाना पटोले म्हणाले.
महाराष्ट्राला लुटून गुजरातकडे पाठवलं जातंय. जी कंपनी गेली त्यामुळे लाखो लोकांना इथे रोजगार मिळणार होता. अशा मोठ्या कंपन्यांना गुजरातमध्ये नेण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली. गेलेली कंपनी महाराष्ट्रात परत यायला पाहिजे, अशी मागणीही नाना पटोले यांनी यावेळी केली.
राहुल गांधी यांची यात्रा सुरू झाली तेव्हापासून भाजपमध्ये अस्वस्थता सुरु झाली आहे. तेव्हापासून काँग्रेस आमदारांच्या फुटीच्या अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. झारखंड आणि बिहारमध्ये आमदार विकत धेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लोकशाही विकत घेण्याचं काम भाजप करत आहे , असं सांगतानाच गोव्याबाबत मला काहीही माहीत नाही, असं त्यांनी सांगितलं.
कोरोनाच्या काळात साधूंना मारलं असा भाजपने गवगवा केला. आता भाजपचे गृहमंत्री आहेत. स्वत:ला हिंदुसम्राट म्हणून घेणारे सत्तेत आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था नाही. सांगलीत झालेल्या घटनेचा निषेध करतोय, असं त्यांनी सांगितलं.
देशात लोकशाही राहीली नाही, स्वत:च्या मस्तीसाठी केंद्र आणि राज्यातील सरकार चाललंय. मुख्यमंत्री – पंतप्रधान यांच्याशी बोलले. आता पीएम मुख्यमंत्र्यांना मान देतात की काय हे कळेल, असा टोलाही त्यांनी लगावला.