काँग्रेसच्या गोटातून मोठी बातमी, मविआची संभाजीनगरमध्ये ‘वज्रमूठ’, पण नाना पटोले अनुपस्थित राहणार, कारण..
छत्रपती संभाजीनगर येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महाविकास आघाडीच्या संभाजीनगर येथील वज्रमूठ सभेला गैरहजर राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
छत्रपती संभाजीनगर : महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) महाराष्ट्रातील सर्वात मोठी एकत्रित अशी जाहीर सभा आज छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली आहे. या जाहीर सभेला शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) या तीनही पक्षांचे बडे नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आलेली. यामध्ये ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि जयंत पाटील, तर काँग्रेस तर्फे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हजर राहणार असल्याची माहिती समोर आलेली. पण सूत्रांकडून नुकतीच मिळालेल्या माहितीनुसार, नाना पटोले सभेला हजर राहणार नाहीत.
नाना पटोले हे सभेत उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार होते. पण अचानक नाना पटोले सभेला येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पण नाना पटोले यांचं न येण्यामागील कारणही समोर आलं आहे. नाना पटोले यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे प्रकृतीच्या कारणास्तव नाना पटोले या सभेला अनुपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.
जयंत पाटील, अजित पवार सभास्थळी दाखल
महाविकास आघाडीकडून छत्रपती संभाजीनगर येथील सभेसाठी गेल्या अनेक दिवसांपासून तयारी सुरु होती. या सभेत मविआकडून जोरदार तयारी करण्यात येणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं अचानक या सभेला येणं रद्द झालं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील या सभेसाठी संभाजीनगर येथे दाखल झाले आहेत. या दोन्ही नेत्यांनी सभेआधी औरंगाबाद येथील कार्यकर्त्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीनंतर हे दोन्ही नेते सभास्थळी व्यासपीठावर दाखल झाले आहेत.
उद्धव ठाकरे काय बोलणार?
उद्धव ठाकरे हे देखील संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. ते आज सभेतून काय बोलणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. महाविकास आघाडीची पहिल्यांदाच अशी जाहीर सभा आयोजित करण्यात आलीय. त्यामुळे या एकत्रित सभेकडे संपूर्ण राज्यातील जनतेचं लक्ष लागलेलं आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरमधील राजकारण तापताना दिसत आहे. कारण भाजप आणि शिवसेनेकडून सावरकर गौरव यात्रा आज काढण्यात आलीय. भाजपच्या या यात्रेवर मविआ नेते काय उत्तर देतात ते पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, पुढच्या काही मिनिटांमध्ये या सभेला सुरुवात होणार आहे.