Congress Protest : महागाई, जीएसटी, ईडीविरोधात काँग्रेसचा एल्गार, प्रियंका गांधींना फरफटत नेले; राहुल गांधी ते नाना पटोले पोलिसांच्या ताब्यात
Congress Protest : काँग्रेसने देशभरात आंदोलन पुकारलं आहे. देशभरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून भाजपचा निषेध नोंदवला आहे. महाराष्ट्रातही या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले. महाराष्ट्रात नाना पटोले, संजय निरुपम आणि भाई जगताप यांच्या नेतृत्वात उग्र निदर्शने करण्यात आली.
नवी दिल्ली: महागाई, बेरोजगारी, जीएसटी आणि ईडीच्या विरोधात आज काँग्रेसने जोरदार आंदोलन (Congress Protest) करून संपूर्ण देश दणाणून सोडला आहे. काँग्रेसने आज देशभर आंदोलन केलं. गल्ली ते दिल्लीपर्यंत झालेल्या या आंदोलनात काँग्रेसच्या अनेक नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (rahul gandhi) आणि प्रियंका गांधी (priyanka gandhi) यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे राहुल गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर प्रियंका गांधी यांना अक्षरश: फरफटत नेऊन पोलीस व्हॅनमध्ये टाकलं. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते प्रचंड संतापले होते. राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या 64 खासदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं. दुसरीकडे महाराष्ट्रातही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. राजभवनाच्या दिशेने मार्च काढत असताना पोलिसांनी नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि भाई जगताप यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात राष्ट्रपती भवनापर्यंत मार्च काढण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे पोलिसांनी काँग्रेसचा हा मार्च अर्ध्या रस्त्यातच अडवला. त्यामुळे राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी रस्त्यावर बसूनच ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलन अधिकच चिघळले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोदी सरकारच्या विरोधात आणि भाजप विरोधात जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतलं. तर प्रियंका गांधी या ठिय्या आंदोलन संपवत नसल्याने पोलिसांनी त्यांनाही फरफटत नेत पोलीस व्हॅनमध्ये बसवलं.
आम्हाला राष्ट्रपती भवनाकडे जाण्यापासून रोखलं
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही शांतता पूर्ण मार्च काढला होता. आण्हाला राष्ट्रपती भवनाकडे जायचं होतं. आमच्या रॅलीत कार्यकर्ते आणि राज्यसभा तसेच लोकसभेतील आमचे खासदार होते. पण आम्हाला जाण्याची परवानगी दिली गेली नाही. महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर आम्ही आंदोलन करत आहोत. देशात रोज लोकशाहीची हत्या होत आहे. काही खासदारांना ताब्यात घेतलं आहे. काहीजणांना मारहाण करण्यात आली आहे, असं राहुल गांधी म्हणाले. भारतीय लोकशाही सुरक्षित राहावी हे आमचं काम आहे. जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही तेच करत आहोत, असं त्यांनी सांगितलं.
मुंबई महाराष्ट्रातही जोरदार आंदोलन
काँग्रेसने देशभरात आंदोलन पुकारलं आहे. देशभरात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळे कपडे घालून भाजपचा निषेध नोंदवला आहे. महाराष्ट्रातही या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटले. महाराष्ट्रात नाना पटोले, संजय निरुपम आणि भाई जगताप यांच्या नेतृत्वात उग्र निदर्शने करण्यात आली. भाजपच्या विरोधात जोरदार घोषणा देत काँग्रेस कार्यकर्त्यांनी संपूर्ण राज्यातील वातावरण ढवळून काढलं. राजभवनावर काढण्यात आलेल्या काँग्रेसच्या मार्चला मध्येच रोखून नाना पटोले आणि भाई जगताप यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.