‘शिवरायांचे नाव घेऊन सत्तेवर आले आणि नरेंद्र मोदींना शिवराय समजू लागेल’, सचिन सावंतांचा घणाघात
"भाजपने अकलेचे तारे तोडले त्याबद्दल तात्काळ माफी मागावी. भाजप हा शिवरायांच्या इतिहासाचे विकृत्तीकरण करणाऱ्या आणि त्यांचा इतिहास संपवणाऱ्या व्यक्तींना आदर्श मानणारा पक्ष आहे", असा घणाघात सचिन सावंत यांनी केला (Congress leader Sachin Sawant slams BJP),
मुंबई : काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरवर शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांची जातीभेदविरोधी भूमिका स्पष्ट करताना महाराजांच्या कन्या सकवारबाई उर्फ सखू यांचे उदाहरण दिलं. वाल्हे गाव येथील महार समाजाच्या काही लोकांना आपले माहेरचे भोसले नाव कसे दिले ही घटना त्यांनी ट्विटरद्वारे विषद केली होती. यावर “सकवारबाई या त्यांच्या पत्नी असताना पत्नीची कन्या करुन टाकली आणि शिवरायांचा अवमान केला, शिवरायांचा खोटा इतिहास सांगितला”, असा दावा भाजपकडून करण्यात आला. भाजपच्या याच दाव्यावर सावंत यांनी स्पष्टीकरण दिलं. यावेळी त्यांनी भाजपवर निशाणा साधला (Congress leader Sachin Sawant slams BJP).
‘भाजपने माफी मागावी’
“भाजपने अकलेचे तारे तोडले त्याबद्दल तात्काळ माफी मागावी. भाजप हा शिवरायांच्या इतिहासाचे विकृत्तीकरण करणाऱ्या आणि त्यांचा इतिहास संपवणाऱ्या व्यक्तींना आदर्श मानणारा पक्ष आहे. शिवस्मारकातही भ्रष्टाचार करणाऱ्या छिंदम प्रवृत्तीच्या पक्षाकडून अधिक अपेक्षा काय असणार? शिवरायांचे नाव घेऊन सत्तेवर आले आणि नरेंद्र मोदींना शिवराय समजू लागेल, यापेक्षा अधिक पातक ते काय?” असा घणाघात सचिन सावंत यांनी केला (Congress leader Sachin Sawant slams BJP).
‘भाजप वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करत आली’
“भाजप वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करत आली आहे. छत्रपतींचे नाव फक्त राजकीय स्वार्थासाठी वापरणाऱ्या भाजपाला शिवराय यांची कन्या आणि पत्नी यांच्यातला फरकही समजला नाही. सकवारबाई या महाराजांच्या कन्या होत्या आणि त्यांच्या एका पत्नीचे नावही तेच होते. पण भाजपाच्या विकृत बुद्धीच्या लोकांनी कन्या आणि शिवरायांची पत्नी यांचे नाव वेगळे असल्याचे सांगून बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला. शिवरायांच्या इतिहासात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत”, असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिला आहे. त्याचबरोबर “भाजपने याप्रकरणी तात्काळ माफी मागावी”, अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘भाजपने काँग्रेसची बदनामी करण्याचा प्रयत्न केला’
“भाजपने काँग्रेसची बदनामी करण्याचा प्रयत्नही केला. यावर काँग्रेसतर्फे महाराजांची कन्या आणि महाराजांची एक पत्नी या दोघींमध्ये नामसाधर्म्य होते आणि दोघींचे नावही सकवारबाई होते हे पुराव्यानिशी स्पष्ट करण्यात आले. प्रख्यात इतिहास संशोधक डॉ. आ. ह. साळुंके यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा दुसरा राज्याभिषेक’ या पुस्तकात महाराजांची कन्या सकवारबाई आणि पत्नी सकवारबाई यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामध्ये शिवापूरयादी तसेच तंजावरच्या शिलालेखात महाराजांची कन्या सकवारबाईंच्या जन्माचा उल्लेख आहे”, असं सावंत यांनी सांगितलं.
सचिन सावंत यांच्याकडून पुस्तकांचा दाखला
सचिन सावंत यांनी प्रख्यात इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या शिवाजी: हिज लाइफ अँड टाइम्स या पुस्तकाचा दाखला दिला आहे. “या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नावही सकवारबाई होते आणि त्यांचे माहेरचे आडनाव गायकवाड होते हे स्पष्ट केलेले आहे. असाच उल्लेख इतिहास संशोधक डॉ. अशोक राणांच्या शिवचरित्राची शिकवण पुस्तकातही आहे. आणि तसाच उल्लेख डॉ. अनिल सिंगारे यांच्या लेखनातही आहे”, असंदेखील त्यांनी सांगितलं.