काँग्रेसकडून पुण्यातून प्रविण गायकवाड की अरविंद शिंदे? संध्याकाळपर्यंत ठरणार
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपने ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, काँग्रेसला अद्यापही उमेदवार मिळत नसल्याची स्थिती आहे. या जागेसाठी संभाजी ब्रिगेडचे नेते प्रविण गायकवाड आणि काँग्रेसचे महापालिका गटनेते अरविंद शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. आज संध्याकाळपर्यंत काँग्रेसकडून आपल्या उमेदवाराची […]
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपने ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, काँग्रेसला अद्यापही उमेदवार मिळत नसल्याची स्थिती आहे. या जागेसाठी संभाजी ब्रिगेडचे नेते प्रविण गायकवाड आणि काँग्रेसचे महापालिका गटनेते अरविंद शिंदे यांचे नाव चर्चेत आहे. आज संध्याकाळपर्यंत काँग्रेसकडून आपल्या उमेदवाराची घोषणा होऊ शकते.
काँग्रेसकडून प्रविण गायकवाड यांना उमेदवारी देण्यासाठी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी मध्यस्थी केल्याचीही चर्चा बरीच रंगली होती. मात्र, त्यानंतरही या जागेच्या उमेदवाराची घोषणा झालेली नाही. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात असल्याचे पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे भाजपने आपला उमेदवार जाहीर करून प्रचारातही आघाडी घेतली आहे. गिरीश बापट मागील लोकसभा निवडणुकीतही पुण्यातून लढण्यासाठी उत्सूक होते, मात्र त्यावेळी त्यांना ते शक्य झाले नाही. अखेर यावेळी बापट यांनी तिकीट मिळवण्यात बाजी मारली आहे.
भाजपकडून उमेदवारीसाठी राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनीही जोर लावला होता. दरम्यान, काही काळ बंडाचे नाट्य झाले. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे नाट्य गुंडाळले. काँग्रेसबाबत परिस्थिती काहीशी वेगळी दिसत असून पुण्यातून कुणाला उमेदवारी द्यायची हाच पेच काँग्रेसला सुटत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुण्यातील लोकसभा लढाई तुल्यबळ उमेदवारांमध्ये होणार की एकतर्फी हे सायंकाळपर्यंत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
निवडणुकीच्या तारखा जाहीर
केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.
महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.