संजय राऊतांनी माझ्या मनातलं बरोबर ओळखलं, तेच अग्रलेखात लिहिलं : नाना पटोले
आजचा सामना अग्रलेख म्हणजे माझ्या मनातील भावना आहेत. संजय राऊत यांनी माझ्या मनातलं बरोबर ओळखलं आणि तेच अग्रलेखात लिहिलं", अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे. (Congress President Nana Patole Comment on Sanjay Raut Saamana Editorial)
मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या राजकीय कार्यपद्धतीवर आज अग्रलेख लिहिला आहे. “हा अग्रलेख म्हणजे माझ्या मनातील भावना आहेत. संजय राऊत यांनी माझ्या मनातलं बरोबर ओळखलं आणि तेच अग्रलेखात लिहिलं”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.
आजच्या सामना अग्रलेखात संजय राऊत यांनी पटोलेंसाठी जोरदार बॅटिंग केली आहे. पटोले यांचा स्वभाव एकदम मोकळा-ढाकळा आहे. त्यांना वाटतं ते बोलून जातात. काँग्रेस पक्षाला मोठ्या हिमतीने ते पुढे घेऊन जात आहेत, असे उद्गार राऊत यांनी अग्रलेखात काढले आहेत. याच अग्रलेखावर पटोले यांना प्रतिक्रिया विचारली असता हा अग्रलेख म्हणजे माझ्या मनातील भावना आहेत, असं पटोले म्हणाले.
काय म्हणाले नाना पटोले?
“आजच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी माझंच मत मांडले. भाजपने देशात अस्थिरतेचं वातावरण निर्माण केलंय, काँग्रेस राज्य आणि देशात लढाई लढत आहे. विरोधक सातत्याने सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करतायत. आम्ही आमची लढण्याची भूमिका आहे”, असं नाना पटोले म्हणाले.
पुढे बोलताना नानांनी 2024 ला महाराष्ट्रात काँग्रेसच नंबर वन पक्ष असेल, अशी पुन्हा एकदा भविष्यवाणी केली. तसंच महाराष्ट्र हे काँग्रेसचं राज्य आहे, हे सांगायला देखील पटोले विसरले नाहीत.
स्वबळावर लढण्यासंबंधी काय म्हणाले नाना पटोले
स्वबळावर लढण्यासंबंधीच्या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत रणकंदन सुरु आहे. त्यामुळे दररोज अमुक नाराज तमुक नाराज असल्याच्या बातम्या येतात. त्याअनुषंगाने बैठकाही पार पडतात. आज पटोले यांना याचविषयी सवाल विचारला असता ते म्हणाले, ” स्वबळावर लढण्यासंदर्भात आम्ही चर्चा करु… आमच्या पक्षाने जो निर्णय घ्यायचा तो आम्ही घेऊ… महाराष्ट्र काँग्रेसचं राज्य आहे… भविष्यात तुम्हाला कळेल, 2024 मध्ये काँग्रेस राज्यात एक नंबरचा पक्ष असेल”, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला.
राऊतांनी अग्रलेखात काय म्हटलं?
“नानांनी अध्यक्षपद स्वीकारल्यापासून काँग्रेसला जमिनीवरून हवेत आणले. काँग्रेस त्यामुळे घोंघावत आहे. नाना बोलतात व काँग्रेस घोंघावते किंवा डोलते… नाना आधी भाजपमध्ये होते. मोदी यांना चार गोष्टी सुनावून त्यांनी पक्षत्याग केला आणि काँग्रेसची धुरा खांद्यावर घेतली. महाराष्ट्र काँग्रेसला संजीवनी द्यायची व राज्यात काँग्रेसला स्वबळावर सत्तेवर आणायचेच हा विडा त्यांनी उचलला आहे. त्यामुळे त्यांच्या हिमतीस दाद द्यावीच लागेल”, असं राऊत आजच्या अग्रलेखात म्हणाले होते.
नानांकडे संजीवनी गुटिका, ते पक्षाला जागे करुन पुढे नेणार
“नानांकडे संजीवनी गुटिका किंवा विद्या आहे व त्यामुळे ते काँग्रेस पक्षाला जागे करून पुढे नेणार आहेत. या संजीवनी गुटिकेची माहिती त्यांनी राहुल गांधी किंवा प्रियंका गांधींना दिली आहे काय? देशातील अनेक राज्यांत काँग्रेस मृतप्राय होऊन पडली आहे व त्या प्रत्येक राज्यात नानांना द्रोणागिरी पर्वत उचलून त्यातली संजीवनी गुटिका द्यावीच लागेल. लक्ष्मण मुर्छीत झाला तेव्हा हनुमानाने हेच केले होते, पण येथे नक्की कोण मुर्छीत झाले आहे व हनुमानाच्या भूमिकेत कोण आहे? ते पाहायला हवे”, असं राऊत आजच्या अग्रलेखात म्हणाले होते.
(Congress President Nana Patole Comment on Sanjay Raut Saamana Editorial)
हे ही वाचा :
…म्हणून नाना पटोले यांचे फोन चोरुन ऐकण्यात आले, संजय राऊतांनी सांगितलं कारण!
नाना रांगडे गडी, ते काय बोलतात आणि कसे डोलतात यावर सरकारचं भवितव्य अवलंबून नाही : संजय राऊत