सत्तेत आल्यावर संविधान बदलणार का?; मोदी म्हणाले, आमच्याकडे 400 चा आकडा…
आम्ही संसदेत आलो. तेव्हा संविधान दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव आणला. त्याला काँग्रेसने विरोध केला. काँग्रेसच्या अध्यक्षांनी त्यावेळी संसदेत म्हटलं होतं की, 26 जानेवारी तर आहे, संविधान दिवस साजरा करण्याची गरज काय? माझ्यासाठी संविधान प्रत्येक शाळेत अभ्यासाचा विषय असावा. प्रत्येक मुलाच्या हृदयात संविधानाचं पावित्र्य असावं. वकिलांसाठी, कोर्टासाठी किंवा कलम लावण्यापुरतं संविधान नाही, तर संविधान जीवनाची प्रेरणा बनली पाहिजे.
नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर संविधान बदलणार आहेत. त्यासाठीच त्यांनी 400 पारचा नारा दिला आहे, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. विरोधकांच्या या दाव्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हवाच काढून घेतली आहे. मोदी यांनी आम्ही सत्तेत आल्यावर संविधान बदलणार नसल्याचं स्पष्ट केलं. आमची सत्तेतील ही दुसरी टर्म आहे. दोन्ही टर्ममध्ये मित्र पक्ष मिळून आम्ही 400 पार होतो. जर संविधानच बदलायचं असतं तर आम्ही तेव्हाच बदललं असतं. पण आम्ही तसं केलं नाही. उलट आम्ही संविधानाची प्रतिष्ठा वाढवली. देशात जम्मू-काश्मीर असूनही देशाचं संविधान जम्मू-काश्मीरला लागू नव्हतं. तिथे आम्ही देशाचं संविधान लागू केलं. त्यामुळे आम्ही संविधान बदलणार असं म्हणण्याला काहीच अर्थ नाही. विरोधकांकडे मुद्दाच नाही, त्यामुळेच ते असा अपप्रचार करत आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीव्ही9 नेटवर्कला महामुलाखत दिली. टीव्ही9 नेटवर्कच्या पाच संपादकांनी राऊंड टेबल मुलाखतीत मोदींशी संवाद साधला. तब्बल दीड तास चाललेल्या या मुक्त संवादावेळी मोदींनी संविधानाबाबतचे अपप्रचार खोडून काढले. आज एनडीएकडे 360 जागा आहेत. बीजेडी एनडीएत नाहीत. पण त्यांच्या जागा गृहीत धरल्यास आमची संख्या 400च्यावर जाते. गेल्या पाच वर्षापासून आम्ही 400 खासदार घेऊन संसदेत बसलो आहोत. संविधान बदलण्याचं पापच करायचं असतं तर तेव्हाच केलं असतं. आम्ही संविधान बदलणार यात सत्यही नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
संविधान बदलणार नाही
आम्ही संविधान बदलणार नाही. तरीही संविधान बदलणार असल्याचं सांगितलं जातं. असं का केलं जातंय? कारण त्यांचा इतिहास पाहा… स्वत: काँग्रेसच काँग्रेसच्या संविधानाला जुमानत नाही. जो पक्ष स्वत:चं संविधान मानत नाही, तो पक्ष देशाच्या संविधानाला कसं मानणार? काँग्रेस पक्षाच्या संविधानाला नष्ट करण्याचं काम एका कुटुंबाने केलं आहे. त्यांनी संविधानाच्या मर्यादा तोडल्या आहेत. मी त्याचं एक उदाहरण सांगतो. काँग्रेसने अधिकृतरित्या नीलम संजीव रेड्डी यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार ठरवलं होतं. अधिकृतरित्या त्यांना उमेदवारी दिली होती. त्यानंतर त्यांच्या पाठीत सुरा खूपसून त्यांना पराभूत केलं. ही काँग्रेसची नीती आहे, असा हल्लाच मोदींनी चढवला.
संविधानाची हत्तीवरून मिरवणूक
मी संविधानाची सर्वात मोठी सेवा केली आहे. जम्मू काश्मीरात 370 हटवून मी देशाच्या संविधानाची सर्वात मोठी सेवा केली आहे. संविधानाच्या प्रती माझं समर्पण पाहा. भारताच्या संविधानाला 60 वर्ष झाले. तेव्हा मी गुजरातमध्ये हत्तीवर संविधानाची मोठी प्रत ठेवली, पूजा केली. मोठी यात्रा काढली. हत्तीवर केवळ संविधान होते. आणि राज्याचा मुख्यमंत्री पायी चालत होता. कारण मला देशाच्या मनात केवळ संविधान ठसवायचं होतं. मला संविधानाची प्रतिष्ठा वाढवायची होती, असं मोदी म्हणाले.